Rohit Sharma will join Virat Shikhar’s 6000 runs club: पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स मंगळवारी सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर या सामन्यात दोन्ही संघांकडे विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी असेल. संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे या सामन्यातील विजयासोबतच एका मोठ्या टप्प्यावर लक्ष आहे. त्याला विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरच्या एलिट क्लबमध्ये सामील होण्याची संधी आहे.
रोहित शर्मा ६००० धावांपासून १४ धावा दूर –
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त तीन खेळाडू आहेत ज्यांनी ६००० धावा केल्या आहेत. या यादीत आरसीबीचा विराट कोहली, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन यांचा समावेश आहे. रोहित या पराक्रमाच्या अगदी जवळ आहे. त्याने २३१ सामन्यात ५९८६ धावा केल्या आहेत. मंगळवारी त्याने १४ धावा केल्या तर त्याच्या सहा हजार धावाही पूर्ण होतील.
रोहितला या सामन्यात खेळणे निश्चित नाही. कारण गेल्या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळला. अशा स्थितीत हैदराबादविरुद्ध रोहितबाबत मुंबई कोणती रणनीती अवलंबते, हे अद्याप स्पष्ट होणार आहे.
विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत –
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याने २२८ सामन्यांमध्ये ६८४४ धावा केल्या आहेत. या लीगमध्ये त्याने ४७ अर्धशतके आणि पाच शतके झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे, ज्याने २१० सामन्यांमध्ये ६४७७ धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत.
या यादीतील पहिल्या पाचमध्ये डेव्हिड वॉर्नर हा एकमेव परदेशी खेळाडू आहे. त्याने १६७ सामन्यात ६१०९ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर मुंबईचा कर्णधार रोहित आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराने या लीगमध्ये ५९८६ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि ४१ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू –
१. विराट कोहली – ६८४४ धावा
२. शिखर धवन – ६४७७ धावा
३. डेव्हिड वॉर्नर – ६१०९ धावा
४. रोहित शर्मा – ५९८६ धावा
५. सुरेश रैना – ५५२८ धावा