Chennai Super Kings Latest News : २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्त झाल्यानंतर एम एस धोनी यंदाच्या आयपीएल हंगामातही चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करत आहे. परंतु, आयपीएल खेळण्याचा धोनीचा हा शेवटचा वर्ष असेल, असा अंदाज नेहमीच बांधला जातो. धोनीनंतर सीएसकेचा कर्णधार कोण असेल? असा सवाल क्रिडाविश्वात उपस्थित झाल्यानंतर खेळाडू आणि क्रिकेट क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी याबाबत प्रतिक्रिया देत असतात.
यावर्षीही चेन्नई सुपर किंग्जच्या भविष्यातील कर्णधारपदाबाबत चर्चा रंगली आहे. या विषयी बोलताना सीएसकेसाठी खेळणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने प्रतिक्रिया दिली आहे. धोनीनंतर सीएसकेच्या कर्णधारपदाची धुरा कोणता खेळाडू सांभाळेल? या प्रश्नावर उत्तर देताना मोईन अलीने बेन स्टोक्सच्या नावाचा उल्लेख केला आहे. टीमसोबत स्टोक्सने चांगल्या प्रकारे समतोल साधला आहे, असा दावा मोईनने केला आहे. तसंच बेन स्टोक्सने स्वत:ला चांगल्या पद्धतीत सिद्ध करून दाखवलं आहे, असंही मोईन म्हणाला आहे.
सीएसके अशा प्रकारची फ्रॅंचायजी आहे, जिथे तुम्ही स्वत: आनंदी राहता आणि टीमसाठी चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करता. स्टोक्सने टीममध्ये चांगल्या प्रकारे स्थान निर्माण केलं आहे. टीमसाठी त्याच्या अनुभवाचा फायदा होईल आणि तो टीमचा एक मोठा हिस्सा आहे. मला असं वाटतं की, ही नक्कीच एक चांगली संधी आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. परंतु, एम एस धोनी अजूनही टीमचे कर्णधार आहेत आणि धोनी काही काळासाठी टीमचं कर्णधारपद सांभाळेल, असंही मोईन अलीने म्हटलं आहे.