Mohammad Amir, Pahalgam Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर केवळ भारतातून नव्हे, तर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
पाकिस्तानच्या या खेळाडूला आयपीएल खेळायचं आहे
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने जियो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ” खरं सांगायचं तर, मला आयपीएल खेळायची संधी मिळाली तर मी नक्की खेळणार. मी ही गोष्ट उघडपणे सांगतोय. पण, मला जर या स्पर्धेत खेळायची संधी मिळाली नाही, तर मी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणार. पुढच्या वर्षीपर्यंत मी आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी पात्र होईन. जर संधी मिळत असेल, तर का नको? मी नक्कीच आयपीएल खेळणार.”
यावर्षी पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे आयोजन उशिराने करण्यात आले आहे. आयपीएल आणि पीएसएल स्पर्धा एकाचवेळी सुरू आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ” पुढच्या वर्षी आयपीएल आणि पीएसएल स्पर्धा एकाच वेळी खेळवली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले गेले होते. जर माझी पीएसएलमध्ये खेळण्यासाठी निवड झाली, तर मी आयपीएल खेळू शकणार नाही. ते माझ्यावर बंदी घालतील. जर माझी आयपीएलमध्ये निवड झाली, तर मी त्या लीगमधून बाहेर पडू शकणार नाही.”
मोहम्मद आमिर आयपीएल २००८ मध्ये खेळताना दिसून आला होता. मात्र त्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्याची अनुमती दिली गेली नाही. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिकाही खेळवल्या जात नाही. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. ते पाहता, मोहम्मद आमिरला आयपीएल स्पर्धेत खेळण्याची अनुमती मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.