Mohammad Kaif’s request to LSG team for Mayank Yadav : आयपीएल २०२४ मधील ४८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याच एकना क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात लखनऊने आपल्या गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर आणि स्टॉइनिसच्या अर्धशतकी खेळीचा जोरावर शानदार विजय मिळवला. या सामन्यात दीपक हुड्डा वगळता लखनऊच्या सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊने १९.२ षटकांत ४ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात माजी खेळाडू मोहम्मद कैफचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो हात जोडून लखनऊ संघाला एक महत्त्वाची विनती करताना दिसत आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दीपक हुड्डा वगळता लखनऊ सुपर जायंट्सच्या सर्व गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. ज्यामध्ये दुखापतीनंतर परतलेल्या वेगवान गोलंदाज मयंक यादवचेही योगदान होते. मात्र, त्याला या सामन्यात पुन्हा एकदा दुखापती झाली. ज्यामुळे त्याला आपले एक षटक पूर्ण न करताच मैदान सोडावे लागले. यानंतर माजी दिग्गज मोहम्मद कैफ लखनऊ संघावर चांगलाच संतापला आहे. मोहम्मद कैफ मयंक यादवबद्दल बोलताना लखनऊ सुपर जायंट्सच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला.
मोहम्मद कैफने लखनऊला मयंकसाठी केली विनंती –
मोहम्मद कैफने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो मयंक यादवच्या फिटनेसबाबत लखनऊ संघ आणि व्यवस्थापनाला विनंती करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये कैफ म्हणाला, “हे पहा, माझी विनंती आहे की, मयंक यादव हा हेरिटेज आहे. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर त्याच्यावर जबरदस्ती करू नका. मला वाटते की त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली आहे. तो गोलंदाजी करताना अचानक आपले षटक अर्धवट सोडून मैदानातून बाहेर गेला. त्याने अनेक वेळा चांगली कामगिरी केली आहे. पण आता जर हा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाला, तर त्याच्या कारकीर्दीसाठी धोकादायक ठरू शकते आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त नसताना त्याला जबरदस्तीने खेळवू नका.” याबरोबरच मोहम्मद कैफने या व्हिडीओत आणखी महत्त्वाची गोष्टी नमूद केल्या.
मोहम्मद कैफने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मयंक यादव पुन्हा मैदानाबाहेर गेला. त्याच्या दुखापतीनंतर एलएसजीने त्याला पळवले का? भारतीय क्रिकेटला त्याची काळजी घेणे आवश्यक आहे, तो एक अमूल्य प्रतिभा असलेला खेळाडू आहे, जो सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : रोहितची सेना ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकणार का? जाणून घ्या भारताची ताकद आणि कमकुवतपणा
काय आहे संपूर्ण प्रकरण?
७ एप्रिल रोजी लखनऊ आणि गुजरात यांच्यातील सामन्यानंतर मयंक यादव तंदुरुस्त नसल्यामुळे काही सामन्यातून बाहेर झाला होता. यानंतर मयंक यादव काल म्हणजेच ३० एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात परतला. पण त्याला चार षटकांचा स्पेलही पूर्ण करता आला नाही. ३.१ षटके टाकल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. मयंकने पहिल्या ३ षटकात ३१ धावा देत १ विकेट घेतला. मयंक दुखापतीमुळे पुन्हा मैदान सोडल्याने लखनऊ सुपर जायंट्स संघावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.