Mohammad Shami Breaks Trent Boult’s Record: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करत आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात गुजरातच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. या सामन्यात शुबमन गिलने धडाकेबाज शतक झळकावत १२९ धावांची खेळी साकारली. त्याचवेळी मोहित शर्माने १० धावा देत ५ बळी घेतले. पण मोहम्मद शमीनेही आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मने जिंकली आणि आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला.
मोहम्मद शमीने अप्रतिम कामगिरी केली –
मोहम्मद शमीने आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्ससाठी अप्रतिम गोलंदाजी करत आहे. त्याने गुजरात टायटन्सचे अनेक सामने एकट्याने जिंकवून दिले आहेत. त्याच्याकडे फलंदाजीचे कोणतेही आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने आपल्या तीन षटकात ४१ धावा देत २ बळी घेतले. यासह, तो आयपीएलच्या एका हंगामातील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. आयपीएल २०२३ च्या पॉवरप्लेमध्ये त्याने आतापर्यंत १७ विकेट घेतल्या आहेत. त्याने ट्रेंट बोल्टला मागे टाकले आहे.
आयपीएलच्या एकाच हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज –
१. मोहम्मद शमी – १७ विकेट, वर्ष २०२३
२. ट्रेंट बोल्ट – १६ विकेट्स, वर्ष २०२०
३. मिचेल जॉन्सन – १६ विकेट्स, वर्ष २०१३
४. दीपक चहर – १५ विकेट, वर्ष २०१९
५. धवल कुलकर्णी – १४ बळी, वर्ष २०१६
गुजरातसाठी केली चमकदार कामगिरी –
मोहम्मद शमी डावाच्या सुरुवातीला चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत आयपीएल २०२३ च्या १६ सामन्यांमध्ये २७ बळी घेतले आहेत. तो आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. शमीला गुजरात टायटन्सने आयपीएल २०२३ च्या मेगा लिलावात ६.२५ कोटी रुपयांना सामील केले होते. तेव्हापासून, तो संघाच्या गोलंदाजी आक्रमणात एक महत्त्वाचा भाग आहे.
गुजरात टायटन्सने जिंकला सामना –
गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २३३ धावा केल्या होत्या, ज्यात शुबमन गिलने शानदार १२९ धावा केल्या. त्याच्यामुळेच गुजरातचा संघ मोठी धावसंख्या करू शकला. त्याचवेळी मुंबई इंडियन्सकडून केवळ तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाच चांगली खेळी करता आली. सूर्यकुमारने ६१ आणि तिलक वर्माने ४२ धावांचे योगदान दिले, मात्र या दोन फलंदाजांशिवाय अन्य कोणीही चांगली खेळी करू शकले नाही.