Mohammed Shami New Record In T-20 Cricket : आयपीएलच्या ६२ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरोधात मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी केली आणि २० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. शमीच्या वेगवान गोलंदाजीनं हैदराबादच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणलं. शुबमन गिलने या सामन्यात शतकी खेळी केली, पण हैदराबादविरोधात घातक गोलंदाजी करून शमीनंही अनेकांच्या भुवया उंचावल्या. शमीने आतापर्यंत आयपीएलमध्ये १२२ विकेट्स घेण्याची जबरदस्त कामगिरी केली आहे. या सामन्यात शमीला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मिळाला नाही, पण त्याने टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा माजी दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला मागे टाकलं आहे. टी-२० शमीच्या नावावर आतापर्यंत १८१ विकेट्सची नोंद झाली आहे. मुरलीधरनने टी-२० मध्ये १७९ विकेट घेतल्या होत्या.
भारताकडून टी-२० मध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर आहे. चहलने ३२० विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे. यानंतर रविचंद्रन आश्विनने टी-२० मध्ये ३०१ विकेट्स घेतल्या आहेत. अमित मिश्राच्या नावावर टी-२० मध्ये २७९ विकेट्स आहेत. तर भुवनेश्वरच्या नावावर २६५ विकेट्सची नोंद आहे. जसप्रीत बुमराहने २५६ विकेट घेतल्या असून हरभजनने २३५ विकेट घेण्याची कमाल केली आहे.
याशिवाय जयदेव उनादकट (२१०), रविंद्र जडेजा (२१०), हर्षल पटेल (२००), विनय कुमार (१९४), अक्षर पटेल (१८७), संदीप शर्मा (१८३), त्यानंतर शमीने १८१ विकेट्स घेत या लिस्टमध्ये भरारी घेतली आहे. शमी भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या लिस्टमध्ये १३ व्या क्रमांकावर आहे.
आयपीएल २०२३ मध्ये शमीने केली कमाल
आयपीएल २०२३ मध्ये शमीने जबरदस्त गोलंदाजी करून २३ विकेट्स घेतल्या आहेत. सध्याच्या घडीला तो परपल कॅपचा विनर आहे. शमी आणि राशिद खानने मिळून या सीजनमध्ये ४६ विकेट्स घेतल्या आहेत. या दोघांच्या अप्रतिम कामगिरीमुळं गुजरात टायटन्स संघाला प्ले ऑफ मध्ये क्वालिफाय होण्यास मदत झाली.