टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीसाठी शनिवारचा दिवस आत्यंतिक निराशेचा ठरला. हैदराबादच्या मैदानावर पंजाबच्या फलंदाजांनी शमीच्या ४ षटकात तब्बल ७५ धावा चोपून काढल्या.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम जोफ्रा आर्चरच्या नावावर आहे. आर्चरच्या ४ षटकात ७६ धावांची लूट झाली होती. शमीचे आकडे या नकोशा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आयपीएल स्पर्धेत भारतीय गोलंदाजाने एका षटकात दिलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम शमीच्या नावे झाला आहे.

शमीने ३ षटकात ४८ धावा दिल्या होत्या. पंजाबच्या डावाचं शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधार पॅट कमिन्सने शमीकडे सोपवली. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनने एक धाव घेत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनसला स्ट्राईक दिला. यानंतर स्टॉइनसने २ धावा घेतल्या. यानंतर स्टॉइनसने एकापाठोपाठ एक ४ उत्तुंग षटकार मारले. ४ षटकारांमुळे शमीचे आकडे एकदमच खराब झाले. त्याच्या ४ षटकात तब्बल ७५ धावा लुटल्या गेल्या. स्टॉइनसने अवघ्या ११ चेंडूत नाबाद ३४ धावांची खेळी केली.

गंभीर अशा दुखापतीतून सावरत शमीने यंदाच्या वर्षीच पुनरागमन केलं होतं. मोहम्मद शमीला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान पायाच्या घोट्याला दुखापत झाली होता. त्यानंतर तो टीम इंडियाच्या बाहेर होता. यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळून त्याने फिटनेसची चाचणी घेतली आणि टीम इंडियात पुनरागमन केले. शमीने रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगाल संघासाठी चांगली कामगिरी केली. मोहम्मद शमीची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली. २८ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध तब्बल ४३५ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं.

वेगासह यॉर्कर, बाऊन्सर अशी असंख्य अस्त्रं भात्यात असणारा शमी टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. शमीने ६४ टेस्ट, १०८ वनडे आणि २५ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०१३ मध्ये शमीने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी पदार्पण केलं. २०१४ ते २०१८ या कालावधीत शमी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. २०१९ ते २०२१ दरम्यान तो पंजाब किंग्जचा हिस्सा होता. २०२२-२०२४ या काळात गुजरात टायटन्स या नव्या संघाने शमीला ताफ्यात समाविष्ट केलं. त्या हंगामात शमीने २० विकेट्स पटकावल्या होत्या. त्याच वर्षी शमीने मानाचा परपल कॅप पुरस्कारही पटकावला होता. यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात हैदराबादने तब्बल १० कोटी रुपये खर्चून शमीला संघात समाविष्ट केलं होतं. शमीचा अनुभव संघासाठी उपयोगी ठरेल अशी चिन्हं होती. मात्र शमीला नव्या हंगामात लय सापडलेली नाही.