Mohit Sharma’s over video: आयपीएल २०२३ ३०व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा सात धावांनी पराभव केला. २२ एप्रिल (शनिवार) रोजी एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात एलएसजीला विजयासाठी १३६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु प्रत्युत्तरात ते सात विकेट्सवर १२८ धावाच करू शकले. गुजरातच्या या विजयाचा हिरो मोहित शर्मा ठरला, ज्याने अखेरच्या षटकात लखनऊला १२ धावा होऊ दिल्या नाहीत. या विजयानंतरही गुणतालिकेत गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
या सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधाराने शानदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याने ५० चेंडूत ६६ धावांची खेळी खेळली, ज्यात दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. हार्दिकच्या खेळीमुळे गुजरातचा संघ सहा विकेट्सवर १३५ धावा करू शकला. यानंतर धावाचा पाठलाग करताना केएल राहुने ६८ धावांची खेळी साकारली. ज्यामध्ये त्याने ६१ चेंडूचा सामना करताना ८ चौकार लगावले. परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
शेवटच्या षटकात १२ धावांची गरज असताना केएल राहुल बाद झाला –
एके काळी सामना एक-दोन षटकं बाकी असताना जिंकला जाईल, असे वाटत होते, पण गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत अखेरच्या षटकात सामना बरोबरीत आणला. शेवटच्या षटकात लखनऊ संघाला १२ धावांची गरज होती. त्यामुळे केएल राहुलने मोहित शर्माच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या, तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. ज्यामुळे लखनऊला मोठा धक्का बसला.त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिसही बाद झाला. चौथ्या चेंडूवर दुसरी धाव घेताना आयुष बडोनी धावबाद झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर दीपक हुडा दुसरी धाव घेताना धावबाद झाला. शेवटच्या चेंडूवर एकही धाव झाली नाही.
असे राहिले सामन्याचे शेवटचे षटक:
पहिला चेंडू – २ धावा (केएल राहुल)
दुसरा चेंडू – विकेट (केएल राहुल)
तिसरा चेंडू – विकेट (मार्कस स्टॉइनिस)
चौथा चेंडू – १ धाव आणि आयुष बडोनी धावबाद
पाचवा चेंडू – १ धाव आणि दीपक हुडा धावबाद
सहावा चेंडू – ० धावा (रवी बिश्नोई)
मोहित शर्मा चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये परतला आहे. त्याने लखनऊविरुद्ध तीन षटकं टाकताना १७ धावा देत दोन विकेट घेतल्या. मोहित शर्माला कोणत्याही परिचयाची गरज नाही आणि तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळला आहे. ३४ वर्षीय मोहितने २६ एकदिवसीय आणि आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ३७ विकेट घेतल्या आहेत.