‘चेंडूवर लाळेच्या वापराला परवानगी मिळाल्याचा मला निश्चितच फायदा होतो आहे’, असं गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहम्मद सिराजने सांगितलं. सिराजने रविवारी हैदराबादविरुद्धच्या लढतीत ४ विकेट्स पटकावल्या. यामुळे गुजरातने हैदराबादला १५२ धावांतच रोखलं. हैदराबादच्या एकापेक्षा एक स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध फलंदाजांना रोखण्यात सिराजची भूमिका निर्णायक ठरली.
‘मी गोलंदाजीचा आनंद लुटतो आहे. मला पुरेशी विश्रांती मिळाली. या काळात मी गोलंदाजीवर आणि फिटनेसवर काम केलं. शरीर ताजंतवानं आहे. लाळेच्या वापरास परवानगी मिळाली आहे. याचा फायदा मला मिळतो आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग होऊ लागला तर विकेट मिळते. लाळेच्या वापरायची परवानगी नव्हती तेव्हा चेंडू बॅटवर सहजतेने येत असे. फलंदाज त्या चेंडूवर जोरदार प्रहार करून धावा वसूल करत. नियम बदलल्यामुळे गोलंदाजांना विकेट पटकावण्याच्या संधी वाढल्या आहेत. या सामन्यातली खेळपट्टी संथ आणि धीमी आहे. मी चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. स्टंप्सच्या दिशेने आक्रमण करणं फायदेशीर ठरतं’, असं सिराजने सांगितलं.
आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने यंदाच्या हंगामात लाळेचा वापर करण्यास परवानगी दिली होती. कोरोना काळात संसर्गाचा धोका लक्षात घेऊन चेंडूवर लाळेच्या वापरास बंदी घालण्यात आली होती. आयपीएलमध्ये ही सूट देण्यात आली असली तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीने हा नियम अद्यापही शिथिल केलेला नाही. ‘आयपीएल’च्या हंगामास सुरुवात होण्यापूर्वी दहाही संघांच्या कर्णधारांची मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत कर्णधारांनी ‘बीसीसीआय’च्या प्रस्तावास मान्यता दिली.
ट्वेन्टी२० प्रकारात फलंदाजांचा दबदबा दिसून येतो. परिस्थिती अनुकूल असेल तरच गोलंदाजांना फायदा होतो. मात्र चेंडूवर लाळेचा प्रयोगास अनुमती मिळाल्याने गोलंदाज आव्हान देऊ शकतात.
लाळेचा वापर केल्या सर्वाधिक फायदा हा वेगवान गोलंदाजांनाच होत असतो. यामुळे चेंडू चांगला स्विंग होण्यास मदत मिळते. आपण अनेक गोलंदाज व क्षेत्ररक्षक चेंडू घासताना किंवा लाळेचा वापर करताना पाहिले असेल. हे सर्वजण चेंडूची लकाकी एका बाजूला कायम राखण्यासाठी प्रयत्न करीत असतात. जेणेकरून चेंडू स्विंग होण्यास सुकर होईल.
‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात चेंडूवर लाळेचा वापर करण्याबाबत कठोर नियम होता. कोणताही खेळाडू चेंडूवर तीनदा लाळेचा वापर करताना दिसला, तर सामन्याच्या मानधनाची २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत होती. तसेच, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला सूचना केली जात असे. तिनदा नियमाचा भंग झाल्यास सामनाधिकाऱ्याकडूण खेळाडू किंवा संघाच्या कर्णधारावर दंडात्मक कारवाई केली जात असे. मात्र, या हंगामापासून लाळेचा वापर करण्यास मिळणार असल्याने गोलंदाजांना अडचणी कमी होणार आहेत.
लाळेचा वापर करण्याबाबत विचार करण्याची विनंती टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडूनही करण्यात आली होती.