खणखणीत सांघिक प्रदर्शनाच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर ७ विकेट्सनी विजय मिळवला. हैदराबादचा यंदाच्या हंगामातला हा चौथा सलग पराभव आहे.

गुजरातने खेळपट्टीचा नूर ओळखून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला बाद केलं. त्याने ८ धावा केल्या. फटकेबाजीला सुरुवात केलेल्या अभिषेक शर्माला सिराजनेच तंबूचा रस्ता दाखवला. त्याने १८ धावा केल्या. पाठोपाठ इशान किशनही बाद झाला. प्रसिध कृष्णाने त्याला स्थिरावू दिलं नाही. ५०/३ वरून हेनरिच क्लासन आणि नितीश रेड्डी यांनी ५० धावांची भागीदारी केली. साई किशोरने क्लासनला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्याने २७ धावा केल्या. पुढच्याच षटकात नितीश रेड्डीला माघारी धाडत हैदराबादला अडचणीत आणलं. त्याने ३१ धावा केल्या. उर्वरित
षटकांमध्ये अनिकेत वर्मा (१४ चेंडूत १८) आणि कर्णधार पॅट कमिन्स (नाबाद २२) यांनी उपयुक्त खेळी करत हैदराबादला सन्मानजक धावसंख्या गाठून दिली. सिराजने १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. प्रसिध कृष्णा आणि साईकिशोर यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शन मोहम्मद शमीची शिकार ठरला. पॅट कमिन्सने जोस बटलरला बाद केलं. यामुळे गुजरातची अवस्था १६/२ अशी झाली. मात्र यानंतर शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. या भागीदारीने गुजरातच्या विजयाचा पाया रचला. गुजरातसाठी पदार्पणात वॉशिंग्टनने ४९ धावांची सुरेख खेळी साकारली. शमीच्या गोलंदाजीवर अनिकेत वर्माने सुरेख झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. कर्णधार शुबमनने सूत्रधाराची भूमिका निभावत संयमी अर्धशतकी खेळी साकारली. वॉशिंग्टन बाद झाल्यानंतर शेरफन रुदरफोर्डने वेगवान पवित्रा स्वीकारला. त्याने अभिषेक शर्माच्या एका षटकात १८ धावा वसूल केल्या. गिलने ४३ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. रुदरफोर्डने १६ चेंडूत ३५ धावांची खेळी केली.