‘खरं सांगायचं तर माझ्या कारकि‍र्दीत विराट कोहलीची भूमिका अतिशय मोलाची आहे. मी कठीण कालखंडातून जात असताना २०१८ आणि २०१९ मध्ये त्याने मला साथ दिला. नेहमी पाठिंबा दिला. विराटमुळेच बंगळुरूने मला रिटेन केलं. त्यानंतरच माझी कामगिरी बहरली. कारकि‍र्दीचा आलेख चढताच राहिला. आरसीबीची साथ सोडणं हा माझ्यासाठी अतिशय भावुक करणारा क्षण होता. मी या संघासाठी ७ वर्ष खेळलो. आरसीबीसाठी खेळलेल्या प्रत्येक सामन्याला चाहत्यांनी भरभरून पाठिंबा दिला. त्यांचं प्रचंड प्रेम लाभलं. आरसीबीविरुद्ध खेळणं हा माझ्यासाठी सर्वस्वी नवा अनुभव असेल’, असं सिराजने गुजरात टायटन्सच्या एका व्हीडिओदरम्यान सांगितलं होतं. सात वर्ष आरसीबीचं प्रमुख अस्त्र असलेल्या सिराजनेच बुधवारी गुजरातच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. आरसीबीसाठी खेळतानाच त्याने सलग दोन निर्धाव षटकं टाकण्याचा पराक्रम केला होता. आरसीबीसाठी त्याने ८७ सामन्यात ८३ विकेट्स घेतल्या आहेत. लिलावात गुजरात टायटन्स संघाने १२.२५ कोटी रुपये खर्चून सिराजला ताफ्यात दाखल केलं. गुजरातचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांचं बारीक लक्ष गोलंदाजी विभागाकडे असतं. सिराजचा वेग, अचूकता आणि गोलंदाजीतलं वैविध्य कामी येईल हे हेरून त्यांनी सिराजला संघात घेतलं.

बुधवारी झालेल्या लढतीत सिराजने ३ विकेट्स पटकावत बंगळुरूला दणका दिला. सिराजलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर बोलताना तो म्हणाला, ‘मी आरसीबीसाठी सात वर्ष खेळलो. सामना खेळायला आलो तेव्हा मनात थोडं दडपण होतं. पण जसं सामना सुरू झाला गुजरातला जिंकून देणं हे माझं उद्दिष्ट होतं. मी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहता आहे त्यामुळे विकेट मिळाल्यानंतर मी त्याच्यासारखं सेलिब्रेशन करतो. मी सातत्याने खेळत होतो त्यामुळे माझ्या हातून काय चुका होत आहेत हे लक्षात आलं नाही. विश्रांती काळात मी गोलंदाजीवर काम केलं. फिटनेस सुधारला. गुजरातच्या कॅम्पमध्ये दाखल झालो तेव्हा प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्याशी बोलणं झालं. खेळाचा आनंद लूट असं त्यांनी मला सांगितलं. मी तेच केलं आणि यश मिळालं. कागिसो रबाडा, इशांत शर्मा आणि बाकी सगळ्या गोलंदाजांशी बोलणं होतं. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. गोलंदाज म्हणून विकेट पटकावण्याचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. फलंदाज चौकार-षटकार लगावणार पण त्याने खचून जायची गरज नाही. मी संघाच्या विजयात योगदान देऊ शकतो हे माझं पक्कं असतं’.

बुधवारी सिराजने बंगळुरूच्या धोकादायक फिल सॉल्टला माघारी धाडलं. सॉल्टला एकदा जीवदान मिळालं होतं पण त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. देवदत्त पड्डीकलला त्रिफळाचीत केलं. अर्धशतक करून स्थिरावलेल्या लायम लिव्हिंगस्टोनला सिराजनेच बाद केलं. ४ षटकात अवघ्या १९ धावांच्या मोबदल्यात सिराजने ३ विकेट्स पटकावल्या आणि गुजरातच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.