एम एस धोनी कॅप्टन कूल म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर कायमच शांत स्वभावाचा धोनी सर्वांना माहित आहे. पण काही प्रसंगी हा कॅप्टन कूल संतापला असल्याचे काही किस्से आपण पाहिले आहेत. आयपीएल २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान नो-बॉलच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी धोनीने मैदानात जाऊन पंचांशी वाद घातला होता, जेव्हा चेन्नईच्या संघाची फलंदाजी सुरू होती. पण आता अजून एक घटना समोर आली आहे.

ही घटना घरी बनवलेल्या बिर्याणीशी संबंधित आहे. २०१४ मध्ये ही घटना घडली होती. तेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चॅम्पियन्स लीग टी-२० सामन्यासाठी हैदराबादमध्ये होते. तत्कालीन बातम्यांनुसार महेंद्रसिंग धोनी एका हॉटेलच्या बाहेरचे जेवण आणण्यास बंदी या धोरणामुळे चांगलाच संतापला होता. धोनी या नियमामुळे इतका संतापला होता की चेन्नई सुपर किंग्ज संघ आयटीसी ग्रँड काकतिया हॉटेलमधून ताज कृष्णा हॉटेलमध्ये गेला होता. अंबाती रायुडूने CSK च्या खेळाडूंसाठी घरी बनवलेली बिर्याणी पाठवली होती.

हॉटेलने सुरुवातीला खेळाडूंना त्यांच्या खोलीत बिर्याणी नेण्यास मनाई केल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. इतर रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की हॉटेलने खेळाडूंना त्यांच्या खोल्यांमध्ये बिर्याणी नेण्याची परवानगी दिली होती, परंतु खेळाडूंना हॉटेलच्या सार्वजनिक आवारात बिर्याणी खाण्यास मनाई केली होती.

त्यावेळी मीडियामधील काही वृत्तांत असे म्हटले होते की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी हॉटेलमध्ये १८० हून अधिक खोल्या बुक केल्या होत्या. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, चॅम्पियन्स लीग T20 सामन्यात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सकडून तीन विकेट्सनी पराभव झाला, पण किमान खेळाडूंनी घरी बनवलेल्या बिर्याणीचा आस्वाद घेतला होता./cu

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ही IPL मधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. त्यांनी आयपीएलची पाच विजेतेपद पटकावली आहेत. सीएसके मुंबई इंडियन्ससह, सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. मुंबई इंडियन्स हा ५ आयपीएल विजेतेपद जिंकणारा पहिला संघ आहे. आयपीएल २०२५ मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे.