CSK vs LSG Match Highlights, Dhoni Video: काल, आयपीएल २०२४ मधील ३९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात रंगला होता. एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे लखनऊ सुपर जायंट्सने यजमानांवर मात केली. या सामन्यातील खेळाडूंइतकंच सोशल मीडियावर कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक होत आहे. एरवी सुद्धा चेन्नईचा सामना म्हटलं की चाहत्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, ऊर्जा, कॅमेरामॅन अचूक टिपतो, त्यातही एखादी धोनीची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली की सोशल मीडियावर व्हायरल झालीच म्हणून समजायचं. अशीच कालच्या सामन्यातील एक क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे. सीएसकेचा कर्णधार रुतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्यातील अभूतपूर्व भागीदारीदरम्यान, कॅमेरामनने धोनीकडे झूम करताच त्याने चिडून दिलेली प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून घेतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एलएसजी विरुद्ध सीएसकेच्या सामन्यात गायकवाडने ६० चेंडूत नाबाद १०८ धावा केल्या, तर दुबेने २२ चेंडूत ५० धावा करून ६६ धावांची खेळी केली. १०४ धावांची भागीदारी रचून सीएसकेने ४ बाद २१० पर्यंत मजल मारली होती. यापूर्वी २०१० मध्ये एमएस धोनी आणि एस बद्रीनाथ यांच्यात १०९* आणि २०१४ मध्ये धोनी आणि माईक हसी यांच्यात १०८* धावांची भागीदारी झाली होती. यानंतर आता तब्बल १० वर्षांनी सीएसकेच्या इतिहासात चौथ्या विकेटसाठी ही तिसरी-सर्वोच्च भागीदारी झाली आहे. ही भागीदारी चालू असताना कॅमेरामॅनने धोनीकडे कॅमेरा झूम केला होता. यावेळी धोनीने चिडून कॅमेराकडे पाण्याची बाटली फेकण्याची कृती केली, त्यानंतर कॅमेरामॅनने पुन्हा खेळाडूंच्या दिशेने कॅमेरा वळवला.

दरम्यान, २११ धावांचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात लखनऊने मार्कस स्टॉइनिसने च्या ६३ चेंडूत १२४ नाबाद धावांच्या बळावर विजय आपल्या नावे केला होता. कालच्या विजायानंतर १० पॉईंट्ससह लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर सीएसके ८ पॉईंट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni angry during ruturaj gaikwad shivam dube partnership at csk vs lsg threatens to throw the bottle ipl 2024 point table svs