MS Dhoni gifts Mustafizur a jersey : आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला अडचणींचा सामना करावा लागत आहे. संघातील काही खेळाडू संघाची साथ सोडली आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान राष्ट्रीय कर्तव्यासाठी बांगलादेशला परतला आहे. जिथे तो झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत सहभागी होणार आहे. बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी मुस्तफिझूर रहमानने चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीची भेट घेतली. या भेटी दरम्यान एमएस धोनीने त्याला एक खास वस्तू गिफ्ट केली.
मुस्तफिजूर रहमनाने धोनीच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये धोनीसह मुस्तफिझूर दिसत आहे. धोनीने त्याची चेन्नईची जर्सी मुस्तफिझूर रहमानला भेट दिली. ही जर्सी धोनीची होती, ज्यावर त्याचा ऑटोग्राफही आहे. या गिफ्टसाठी आणि भेटीसाठी बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजाने एमएस धोनीचे आभार मानले. तसेच या पोस्टमध्ये मुस्तफिझूर रहमानने धोनीचे कौतुक करताना लिहिले, “प्रत्येक गोष्टीसाठी माही भाई धन्यवाद. हे माझे भाग्य आहे की मला तुमच्यासारख्या दिग्गज व्यक्तीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.”
एमएस धोनीकडून मिळालेल्या टिप्सबद्दल मुस्तफिझूरने कृतज्ञताही व्यक्त केली. मुस्तफिझूर पुढे म्हणाला की, “मला तुमच्याकडून शिकायला मिळालेल्या गोष्टी मला आठवतील. मी तुम्हाला पुन्हा भेटू इच्छितो आणि तुमच्याबरोबर खेळू इच्छितो.” या हंगामात चेन्नईकडून खेळताना मुस्तफिझूरने ९ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत चेन्नईला मायदेशी परतलेल्या मुस्तफिझूर रहमानची उणीव नक्कीच भासेल.
हेही वाचा – पियुष चावलाने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडत रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा गोलंदाज
मुस्तफिझूर रहमान मायदेशी का परतला?
मुस्तफिझूर रहमानला बांगलादेश बोर्डाने ३० मेपर्यंत आयपीएल खेळण्यासाठी एनओसी दिली होती, पण नंतर एनओसी १ मेपर्यंत वाढवण्यात आली होती. कारण १ मे रोजी चेन्नईचा पंजाबशी सामना होता. तो सामना चेन्नईने गमावला. आश्चर्यकारक बाब म्हणजे बांगलादेश बोर्डाने झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळण्याचे कारण देत मुस्तफिझूर रहमानला मायदेशी बोलावले आहे. पण त्याला पहिल्या ३ सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेनंतर बांगलादेशचा संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार आहे. मुस्तफिजुर रहमानला टी-२० विश्वचषकात संधी मिळू शकते, असे मानले जात आहे.