MS Dhoni breaks silence on IPL retirement: आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या नेतृत्वाची धुरा एमएस धोनी सांभाळत आहे. त्याने नुकताच आयपीएलमधील आपल्या ५००० धावांचा टप्पा पार केला आहे. परंतु सातत्याने तो कधी निवृत्त होणार आहे, याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या चालू हंगामात पहिल्यांदाच निवृत्तीच्या वृत्तावर मौन सोडले आहे. आपल्या चाहत्यांना दिलासा देताना धोनी म्हणाला आहे की, याविषयी (निवृत्ती) निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे, आमच्याकडे अजून बरेच सामने बाकी आहेत आणि मी आता काही बोललो तर प्रशिक्षकांवर दबाव येईल आणि मी तसे करणार नाही. कारण मला त्यांच्यावर कोणताही दबाव टाकायचा नाही.
धोनी २-३ वर्षे निवृत्त होणार नाही –
सीएसकेच्या एका कार्यक्रमादरम्यान धोनीने स्वतः या गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमादरम्यान धोनीला त्याच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना धोनी म्हणाला की, निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ शिल्लक आहे. धोनीच्या बोलण्यावरून असे दिसते की माही या सीझनमध्ये किंवा पुढील २-३ सीझनमध्ये निवृत्त होणार नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
या हंगामात माही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे –
४१ वर्षीय महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२३ मध्येही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच त्याने सीएसकेचा कर्णधार म्हणून २०० वा सामना खेळला. याशिवाय धोनी फलंदाजीतही चांगली कामगिरी करत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात धोनीने १७ चेंडूत ३२ धावा केल्या होत्या. धोनीने आपल्या डावात एक चौकार आणि तीन षटकार मारले होते. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १८८.२४ चा होता.
गेल्या मोसमात धोनीने कर्णधारपद सोडले होते –
आयपीएलचा हा सीझन सुरू होण्यापूर्वी धोनीबद्दल असे बोलले जात होते की, माही या सीझनमध्ये शेवटचा खेळताना दिसणार आहे. धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून गाजत होत्या, मात्र आता माहीने त्या बातम्यांना ब्रेक लावला आहे. धोनीने गेल्या मोसमात सीएसकेचे कर्णधारपद निश्चितच सोडले होते. त्याच्या जागी रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले, पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाची कामगिरी खालच्या पातळीवर आली, त्यानंतर जडेजानेच पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले.
हेही वाचा – Rinku Singh: पुन्हा एकदा रिंकू सिंगने जिंकली मनं! मैदानाबाहेर केली शानदार कामगिरी, गरजूंना दिला मदतीचा हात
धोनीच्या निवृत्तीच्या वृत्तावर त्याच्या संघातील अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनेही प्रतिक्रिया दिली होती. मोईन अलीने म्हटले होते की, धोनी वयाच्या ४१ व्या वर्षीही खूप चांगली कामगिरी करत आहे, मला वाटते की धोनी पुढचा सीझन देखील आरामात खेळू शकेल. कारण त्याचे वय त्याच्या कामगिरीत कुठेही आडवे येत नाही, अन्यथा या वयात भारतातील क्रिकेटपटू धोनीसारखी कामगिरी करू शकत नाहीत.