IPL 2023, GT vs CSK Cricket Update : जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेला एम एस धोनी यशाचं नवीन शिखर गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. गतवर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पणातच जेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या गुजरात टायटन्सविरोधात चेन्नई सुपर किंग्ज भिडणार आहे. आज सायंकाळी हे दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमने-सामने येणार आहेत. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएलमध्ये दर वर्षी नवीन विक्रमाला गवसणी घालण्यात आली आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या हंगामात महेंद्र सिंग धोनी पाच हजार किंवा त्याहून अधिक धावांचा पल्ला पार करत नवीन विक्रम करू शकतो. पाच हजार धावा पूर्ण केल्यानंतर अशी कामगिरी करणारा धोनी सातवा खेळाडू बनेल.
धोनीने टी-२० लीगमध्ये आतापर्यंत ४९७८ धावा कुटल्या आहेत. त्याने दोन फ्रॅंचायजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं कर्णधारपद सांभाळलं आहे. यंदाही धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके मैदानात उतरणार आहे. जर धोनीने गुजरात टायटन्सविरोधात आज होणाऱ्या पहिल्या सामन्यात २२ धावा केल्या, तर आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर पाच हजार धावांची नोंद होईल. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्याने २२३ सामन्यांमध्ये ६६२४ धावांपर्यंत मजल मारली आहे.
त्यानंतर शिखर धवन, डेविड वॉर्नर, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि एबी डिविलियर्स यांच्या नावांची नोंद आहे. गुजरातविरोधात होणाऱ्या पहिल्या सामन्यात धोनीच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धोनीला किरकोळ दुखापत झाली असल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत अधिकृत माहिती सादर करण्यात आली नाहीय. त्यामुळे आजच्या गुजरात टायटन्स विरुद्ध सीएसकेच्या सामन्यात धोनी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.