MS Dhoni completes 250 sixes in IPL : आयपीएल २०२४ मधील ५९ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात घरचा संघ गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३५ धावांनी पराभव केला. या सामन्यातील पराभवामुळे चेन्नईच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा संघ हा सामना हरला असला तरी कोट्यवधी चाहत्यांच्या लाडक्या एमएस धोनीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
एमएस धोनीने डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली –
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ११ चेंडूत २६ धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात त्याने एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. या सामन्यात धोनीने तिसरा षटकार ठोकताच एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली. एमएस धोनीच्या नावावर आता आयपीएलमध्ये २५१ षटकार आहेत. महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही आयपीएलमध्ये इतकेच षटकार ठोकले आहेत. डिव्हिलियर्सने १७० डावात २५१ षटकार मारले, तर धोनीने २२८ डाव घेतले. आता हे दोन्ही फलंदाज आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत.
धोनी विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये झाला सामील –
एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासात २५० षटकारांचा टप्पा पार करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही ही कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नावावर २५० डावांमध्ये २७६ षटकार आहेत, तर विराट कोहलीने आतापर्यंत २४१ डावांमध्ये २६४ षटकार मारले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये गेलने ३५७ षटकार मारले आहेत.
हेही वाचा – GT vs CSK : आयपीएलमध्ये ‘शतक शंभरी’; शुबमन गिल, साई सुदर्शनने झळकावली वेगवान शतकं
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज –
ख्रिस गेल – ३५७ षटकार
रोहित शर्मा – २७६ षटकार
विराट कोहली – २६४ षटकार
एबी डिव्हिलियर्स – २५१ षटकार
एमएस धोनी – २५१ षटकार
चेन्नई सुपर किंग्जला महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील पराभवामुळे संघाला नेट रन रेटचे नुकसान झाले आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शतकांच्या जोरावर २० षटकांत तीन गडी गमावून २३१ धावा केल्या.
या सामन्यात शुबमनने ५५ चेंडूत १०४ धावांची तर साई सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावांची शानदार खेळी केली. तर दुसऱ्या डावात चेन्नई सुपर किंग्ज संघाला सुरुवातीलाच धक्के बसले. या सामन्यात त्यांचा टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरला. मिशेल आणि मोईन यांनी मधल्या षटकांमध्ये काही धावा केल्या, तरीही संघाला २० षटकांत ८ गडी गमावून १९६ धावांपर्यंतच मजल मारता आली. ज्यामुळे गुजरातने हा सामना सहज जिंकला.