आयपीएलचा १७ वा हंगाम सध्या सुरू आहे. वेगवेगळ्या संघातील खेळाडूंचे चाहत्यांसाठी आयपीएल ही पर्वणी असते. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. धोनीच्या खेळाचेच नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वाचेही अनेकजण चाहते आहे. सामान्य कुटुंबातून येऊन एक मुलगा देशाचे नेतृत्व करतो, याचे अनेकांना कौतुक वाटते. यातूनच चाहत्यापेक्षाही पुढची पायरी काहीजण गाठतात. चेन्नई मधील एका चाहत्याने धोनीच्या प्रेमापोटी असं काही कृत्य केलं की, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एमएस धोनीची झलक पाहण्यासाठी एका चाहत्याने आपल्या तीन मुलींसह चेन्नईच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली. पण यासाठी त्याने ६४ हजार रुपये खर्च केले.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार तिकीट विकत घेणाऱ्या इसमाने सांगितले, “मला ८ एप्रिलच्या सामन्याची तिकीटे मिळाली नाहीत. त्यामुळे मी काळ्या बाजारातून तिकीटे विकत घेण्यासाठी ६४ हजार रुपये खर्च केले. मला अजून माझ्या मुलींची शाळेची फी भरायची आहे. पण एमएस धोनीला आम्हाला एकदा पाहायचे होते. माझ्या तीनही मुली आणि मी आता खूप आनंदी आहोत.”
कोल्हापुरात रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं, क्रिकेट रसिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
चेन्नईची कोलकात्यावर मात
तीन मुलींपैकी सर्वात लहान मुलीने म्हटले, “तिकीटे मिळविण्यासाठी माझ्या वडिलांनी खूप प्रयत्न केले होते. जेव्हा आम्ही मैदानावर धोनीला खेळताना पाहिले, तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटला.” २००८ पासून आयपीएलची सुरुवात झाली. इतक्या वर्षांमध्ये आयपीएलची क्रेझ जराही कमी झालेली नाही. उलट ती वाढत आहे, या असा उदाहरणांवरून ते दिसते.
८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट राइडर्स यांच्यात सामना रंगला होता. चेन्नईने सात विकेट्स राखून कोलकाताचा पराभव केला आणि कोलकाताचा विजयी रथ रोखला. रवींद्र जाडेजाने गोलंदाजीची कमाल दाखवत केवळ १८ धावा देत तीन बळी मिळवले. कोलकाताने ९ बळी गमावून केवळ १३८ धावा केल्या होत्या. चेन्नईने फलंदाजी करताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले आणि १४ चेंडू शेष ठेवून सामना खिशात घातला.