MS Dhoni fans trolled Rachin Ravindra after csk vs mi ipl 2025 match : चैन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२५ मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा ४ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात रचिन रवींद्र याने नाबाद ६५ धावांची विजयी खेळी केली आणि तोच या विजयाचा शिल्पकार ठरला. मात्र असे असूनही रचिन रविंद्र याला ट्रोल करण्यात येत आहे. तो ट्रोल होण्यामागील कारण दुसरं काही नसून एमएस धोनी आहे. एमएस धोनी हा सामन्याच्या १९व्या ओव्हारमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती की धोनी त्याच्या खास स्टाईलमध्ये षटकार ठोकून हा सामना सीएसकेला जिंकून देईल.

नेमकं काय झालं?

एमएस धोनी फलंदाजीसाठी उतरला तेव्हा चेन्नईच्या संघाला ८ चेंडूंमध्ये ४ धावांची आवश्यकता होती. धोनीने त्याचे दोन्ही चेंडू डॉट खेळले, ज्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये तो नॉन-स्ट्रायकिंग एंडवर गेला. शेवटची ओव्हर करण्यासाठी मिचेल सँटनर आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर रचिन रविंद्र याने षटकार ठोकला आणि सीएसके संघाला विजय मिळवून दिला. मात्र यामुळे धोनीचे फॅन हे रचिन रविंद्र याला ट्रोल करताना दिसत आहेत.

एमएस धोनीचे फॅन्स रचिन रवींद्र याला ट्रोल करत आहेत. काही जणांनी रवींद्र याने एक धाव घ्यायला पाहिजे होती, तर काहींनी धोनीला संधी दिली पाहिजे होती असे म्हटले आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी रचिन रवींद्र याला शिवीगाळ देखील केली आहे. इतकेच नाही तर काही जणांनी त्याला पुढील सामन्यासाठी संघातून वगळले पाहिजे अशी देखील मागणी केली आहे. धोनीच्या चाहत्यांनी व्यक्त केलेला हा संताप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

जेव्हा एखादा खेळाडू षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देतो तेव्हा संघाच्या चाहत्यांना आनंद झाला पाहिजे मात्र यावेळी ‘थाला’ म्हणजेच एमएस धोनीचे चाहते रचिन रवींद्र याने षटकार मारायला नको होता असे म्हणताना दिसत आहेत.

जेव्हा एमएस धोनी मैदानावर उतरतो तेव्हा मैदानावरील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. प्रेक्षक मोठमोठ्याने ओरडून त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम व्यक्त करताना दिसतात. धोनीच्या फॅनबेसबद्दल बोलताना रचिन रविंद्र म्हणाला की, “जेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष हे सामन्यावर असतं तेव्हा तुम्ही सर्व गोष्टी विसरून जाता कारण संपूर्ण लक्ष्य हे विजयावर केंद्रीत असते. पण धोनीला मिळणाऱ्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करणे अवघड आहे.”