Chennai Super Kings MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा प्रबळ दावेदार आहे. चेन्नईने रविवारी राजस्थानविरूद्ध झालेल्या सामन्यात पाहुण्या संघाचा पराभव केला. चेपॉकवरील हा सामना यंदाच्या आयपीएलमधील चेन्नईचा शेवटचा सामना होता. त्यामुळे हा सामना सर्वांचा लाडका असलेल्या एम एस धोनीचा अखेरचा आयपीएल सामना होता, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. चेन्नईनेही सर्व खेळाडूंना मेडल देत, चाहत्यांचे आभार मानत हा चेपॉकवरील शेवटचा सामना अधिक संस्मरणीय बनवला. याच सामन्यानंतर भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी फलंदाज असलेल्या अंबाती रायडूने धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
अंबाती रायडू म्हणाला की, गेल्या काही वर्षांतील भारत आणि सीएसकेसाठी धोनीची कामगिरी लक्षात घेता, चेन्नईमध्ये एमएस धोनीचे मंदिर बांधले जाईल. अंबाती रायडूने स्टार स्पोर्ट्सला सांगिताना म्हटले की, “धोनी हा चेन्नईचा देव आहे आणि येत्या वर्षभरात चेन्नईत एमएस धोनीचे मंदिर बांधले जाईल, असा विश्वास मला आहे.”
हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
पुढे म्हणाला, “तो एक असा व्यक्ती आहे जो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो, ज्याने संघ, देश आणि CSK साठी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माहीने भारताला दोन विश्वचषक आणि चेन्नईला पाच आयपीएल ट्रॉफीसह दोन चॅम्पियन्स लीगची विजेतेपदे मिळवून दिली आहेत.”
चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून विजय मिळवल्यानंतर ऋतुराजच्या नेतृत्त्वाखालील संघाने प्लेऑफ मोठे पाऊल टाकले आहे. आता १३ सामन्यांमध्ये सात विजय मिळवल्यानंतर चेन्नईचा नेट रन रेट चांगला असून संघाच्या खात्यात १४ गुण आहेत. गुणतालिकेत संघ तिसऱ्या स्थानावर आहे. जर CSK प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही, तर धोनीने या मोसमात एमए चिदंबरम स्टेडियमवर शेवटचा सामना खेळला असे निश्चित होईल.