नवी दिल्ली : ‘आयपीएल’मध्ये आता सातत्याने होणाऱ्या मोठ्या धावसंख्यांना ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम कारणीभूत असल्याचे काही लोक म्हणतात. मी याच्याशी सहमत नाही. खेळपट्ट्यांचे स्वरूप आणि संघांची आक्रमक शैलीत खेळण्याची तयारी, हे यामागील मुख्य कारण आहे, असे चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला.
४३ वर्षीय धोनीने आता चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडले असले, तरी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून तो अजूनही महत्त्वाची भूमिका बजावतो. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ अर्थात प्रभावी खेळाडूचा नियम गेल्या हंगामापासून लागू करण्यात आला. या नियमामुळे सामन्यादरम्यान संघांना गरजेनुसार एक बदल करता येतो. प्रथम फलंदाजी केल्यास दुसऱ्या डावात एका फलंदाजाच्या जागी गोलंदाजाला मैदानात आणण्याची संघाकडे मुभा असते. तसेच प्रथम गोलंदाजी केल्यास धावांचा पाठलाग करताना एका अतिरिक्त फलंदाजाला संधी देता येऊ शकते. या नियमाबाबत बरीच मतमतांतरे आहेत. धोनीने या नियमाला स्पष्ट समर्थन दर्शविले नसले, तरी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील बदलाचा हा एक भागच आहे, असे तो म्हणाला.
‘‘पहिल्यांदा जेव्हा हा नियम लागू करण्यात आला, त्यावेळी मी त्याच्या पक्षात नव्हतो. मला या नियमाचा काही फायदा होऊ शकेल का, असाही मी विचार केला. मात्र, मला यष्टिरक्षण करावेच लागते. त्यामुळे मी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ असू शकत नाही. सामना सुरू असताना मला खेळात गुंतून राहायला आवडते. या नियमामुळे धावसंख्या वाढू लागली असे लोक म्हणतात. मात्र, मला हे पटत नाही,’’ असे धोनीने सांगितले. ‘‘तुम्हाला अतिरिक्त फलंदाज खेळवता येत असला, तरी यामुळेच मोठ्या धावसंख्या उभारल्या जात आहेत असे नाही. आता खेळाडूंच्या मानसिकतेत बदल झाला आहे. संघ अधिक आक्रमक शैलीत खेळण्यास तयार असतात. काही वेळा अतिरिक्त फलंदाजांची तुम्हाला गरजही भासत नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेट आता बदलत चालले आहे आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम याचाच भाग आहे,’’ असे धोनीने नमूद केले.