MS Dhoni Batting Order In CSK: यंदाच्या आयपीएलला सुरुवात होऊन अवघा एक आठवडाच झाला असून, आता मैदानाबरोबर मैदानाबाहेरही स्पर्धेची रंगत चढू लागली आहे. काल चेन्नईमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा ५० धावांनी पराभव केला. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नईला २० षटकांत ८ बाद १४६ धावाच करता आल्या. चेन्नईच्या फलंदाजीची आघाडीची फळी सुरुवातीलाच ढासळ्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांकडून अपेक्षा होती. परंतु, ते ही काही खास कामगिरी करू शकले नाहीत.
दरम्यान या सामन्यात एमएस धोनी थोडे वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकला असता. मात्र, तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. दरम्यान धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवल्यामुळे चेन्नई संघ व्यवस्थापनासह त्याच्यावरीही टीका होऊ लागली आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी धोनीच्या फलंदाजी क्रमांकावर टीका केली आहे.
धोनीवर टीका होत असताना आता त्याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आयपीएलमध्ये इतक्या खालच्या क्रमांकावर खेळण्याच्या निर्णयामागील कारण सांगितले आहे. यंदाच्या आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत धोनीने खुलासा केला होता की, तो राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याच्या स्पर्धेत नाही म्हणून तो फलंदाजीसाठी त्याच्या आधी इतर खेळाडूंना संधी देऊ इच्छितो.
यामुळे संघाचे नुकसान नाही
या मुलाखतीत धोनी म्हणाला होता की, “माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ती गंभीर नव्हती. तसेच, टी-२० विश्वचषकासाठी संघाची निवड होणार होती. जर तुम्ही आमच्या संघाकडे पाहिले तर, कोण दावेदार होते? जड्डू आणि शिवम दुबे. म्हणून त्यांना संधी द्यायची आहे हे स्पष्ट होते. मी राष्ट्रीय संघासाठी स्पर्धेत नाही, म्हणून त्यांनी माझ्या आधी फलंदाजी करणे महत्त्वाचे होते.”
दरम्यान खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या त्याच्या निर्णयाचे धोनीने समर्थन केले होते. “माझ्या आधी फलंदाजी करणारे फलंदाज चांगली कामगिरी करत असून, या निर्णयामुळे संघाचे कोणतेही नुकसान झाले नाही”, असेही तो मुलाखतीत म्हणाला होता.
धोनीची फटाकेबाजी
दरम्यान बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही धोनीने १६ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. यादरम्यान त्याने कृणाल पांड्याच्या सलग दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले. हे सामन्याचे अंतिम षटक होते. पण, तोपर्यंत चेन्नईच्या हातातून हा सामना निसटला होता.