MS Dhoni Parents Presents in CSK vs DC Match IPL 2025: चेन्नई सुपर किंग्स चेपॉकच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामना खेळत आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर चेन्नईचा संघ घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी उतरला आहे. या सामन्यात ऋतुराजच्या दुखापतीमुळे धोनी सीएसकेचे नेतृत्त्व करणार, अशी चर्चा होती. पण ऋतुराज नाणेफेकीसाठी उतरला होता. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे धोनीचे आई-बाबा हा सामना पाहण्यासाठी चेपॉकमध्ये हजर आहेत. दरम्यान धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनीही जोर धरला आहे.

एस एस धोनी चेपॉकवरील सामन्यानंतर निवृत्ती घेणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. आयपीएल २०२५ च्या मध्यात, धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यांनी जोर धरला आहे, याचं कारण म्हणजे धोनीच्या जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच धोनीचे आई-वडील त्याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी गेली ५ वर्षे फक्त आयपीएल खेळत आहे. पण यादरम्यान तो आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार का, असा प्रश्न अनेकदा निर्माण झाला होता. गेल्या दोन हंगामात या प्रश्नांनी जोर धरला होता. विशेषत: आयपीएल २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन बनल्यानंतर, धोनी कदाचित निवृत्त होईल असं म्हटलं जात होतं. पण चेन्नई संघ आणि चाहत्यांसाठी धोनीने पुनरागमन केले आणि गेल्या सत्रातही तो खेळला. मात्र या दरम्यान धोनीचे आई-बाबा कधीही त्याला मैदानात खेळण्यासाठी पाहायला पोहोचले नव्हते.

पण IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना पाहण्यासाठी धोनीचे आई-वडील अचानक आल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये खळबळ वाढली आहे. धोनी निवृत्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चेपॉक स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी, शो दरम्यान, जिओ-हॉटस्टारच्या अँकरने खुलासा केला की धोनीचे आई-बाबा सामना पाहण्यासाठी आले आहेत आणि लगेच ही बातमी वणव्यासारखी पसरली. धोनीच्या आईबाबांना सामन्यादरम्यान स्क्रिनवर पाहून धोनी खरंच निवृत्त होणार, या चर्चेला अधिक उधाण आलं.

२३ मार्चला एमए चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला चार विकेटने हरवून सीएसकेने त्यांच्या मोहिमेची सुरुवात एका दमदार विजयाने केली. पण पुढच्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ५० धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात धोनीने १६ चेंडूत ३० धावांचे योगदान दिले, परंतु ९ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरल्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात, धोनीने ११ चेंडूत १६ धावा केल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार होता, परंतु सीएसकेच्या शेवटच्या षटकात संदीप शर्माने त्याला बाद केले. सीएसकेचा मॅचविनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला अलिकडच्या काळात फिनिशर म्हणून संघर्ष करावा लागला आहे.

आयपीएल २०२३ पासून सीएसकेने जिंकलेल्या १८ सामन्यांमध्ये धोनीने फक्त तीन धावा केल्या आहेत. याउलट, १४ पराभवांमध्ये त्याने ८३ च्या सरासरीने १६६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये विशाखापट्टणममध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद ३७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.