मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान, पंचांच्या निर्णयावर जाहिररित्या टीका केल्याबद्दल कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दंड ठोठाविण्यात आला आहे. त्यानुसार धोनीच्या मानधनातील १० टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. चेन्नईने मंगळवारी वानखेडे मैदानात मुंबईविरुद्ध झालेली लढत २५ धावांनी गमावली होती. यावेळी चेन्नईचा सलामवीर ड्वेन स्मिथला पंचांनी ज्याप्रकारे बाद दिले ते भयानक असल्याचे धोनीने म्हटले होते. डावाच्या सुरूवातीलाच स्मिथ शुन्यावर बाद झाला. पंचांचा तो निर्णय भयानकच म्हणावा लागेल. त्यानंतर आम्ही सामन्याच्या मध्यावर लय गमावली, असे धोनीने सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्यात म्हटले होते. मात्र, धोनीने अशाप्रकारे पंचांच्या निर्णयावर सार्वजनिकपणे टीका करणे अयोग्य असल्याचे ठरवत सामनाधिकाऱ्यांनी त्याला दंड ठोठावला. त्यानंतर धोनीनेही आपली चूक कबुल करत आपल्याला हा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. चेन्नईच्या डावाच्या सुरूवातीला पहिल्याच षटकात लसिथ मलिंगाचा फुलटॉस चेंडू स्मिथच्या पॅडवर आदळला होता. तेव्हा पंचांकडून स्मिथला पायचीत ठरविण्यात आले होते. मात्र, रिप्लेमध्ये  चेंडू यष्टीला बगल देऊन जात असल्याचे  स्पष्ट दिसत होते.

Story img Loader