चेन्नई सुपर किंग्ससाठी मथीशा पथिराना हा एक्स फॅक्टर ठरला आहे. २०२२ मध्ये सीएसके संघाशी जोडलेला पथिराना हा आता चेन्नईचा मुख्य गोलंदाज झाला आहे. त्याच्या स्लिंगिंग ॲक्शनमुळे तो ‘बेबी मलिंगा’ म्हणून प्रसिद्ध झाला. पथिरानाचा एक व्हीडिओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये पाथिरानाने धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे, जे आता व्हायरल होत आहे.
श्रीलंकेच्या अंडर-१९ संघातील चमकदार कामगिरीनंतर तो वरिष्ठ संघातही सामील झाला परंतु तिथे त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यानंतर चेन्नई सुपर किंग्जने त्याची दखल घेत फ्रँचायझीने २०२२ मध्ये त्याचा संघात समावेश केला. पदार्पणाच्या मोसमात त्याला फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली. यानंतर आयपीएल २०२३ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येही त्याची कामगिरी काही खास नव्हती. पण दरवेळेप्रमाणे महेंद्रसिंग धोनीने पाथिरानावर विश्वास दाखवला आणि त्याला संधी दिल्या. याचा परिणाम असा झाला की आज पाथीराना हा सीएसकेचा मुख्य गोलंदाज आहे. स्वत: पाथीरानाने आपल्या यशाचे श्रेय धोनीला दिले आहे.
पाथिरानाचे धोनीवर मोठे वक्तव्य, दिले वडिलांचे स्थान
CSK ने युट्युबवर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये पाथीराना म्हणाला, “माझ्या वडिलांनंतर, क्रिकेट जीवनात धोनी माझ्या वडिलांची भूमिका बजावतोय. तो नेहमी माझी काळजी घेतो. मैदानात मी काय केलं पाहिजे याबद्दल मला सल्ला देत असतो. मी घरी असतो तेव्हा माझे वडीलही मला असंच मार्गदर्शन करतात, माझ्यासाठी ते पुरेसं आहे.”
धोनीच्या मार्गदर्शनावर पाथिराना म्हणाला, “मी मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर धोनी मला खूप सल्ले देत बसत नाही, तो मला फक्त छोट्याछोट्या गोष्टी सांगतो, पण त्या गोष्टींमुळे खूप फरक पडतो, त्यातून मला खूप काही शिकायला मिळतं आणि आत्मविश्वासही वाढतो. खेळाडूंना कसं सांभाळून घ्यायचं हे त्याला चांगलं माहित आहे. आम्ही मैदानाबाहेर जास्त बोलत नाही, पण मला काही विचारायचं असेल तर मी बिनधास्त त्याला जाऊन विचारतो.”
IPL 2024 मधील चेन्नईचा मुख्य वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आहे. या मोसमात त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने फिरवले. चेन्नईने आतापर्यंत १० पैकी ५ सामने जिंकले असून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. सुरुवातीला खेळल्यानंतर पथिराना दुखापतीमुळे ४ सामन्यांसाठी बाहेर होता. त्यामुळे त्याला केवळ ६ सामने खेळता आले ज्यामध्ये त्याने १३ विकेट घेतले आहेत.