MS Dhoni Explains Reasons For Defeat Against Rajasthan: आयपीएलच्या १६व्या हंगामातील ३७व्या लीग सामन्यात राजस्थान रॉयल्सने (आरआर) चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध ३२ धावांनी मोठा विजय मिळवला. या पराभवानंतर सामन्यापूर्वी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला चेन्नई संघ आता थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून राजस्थान संघाने पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला या सामन्यात २०३ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांना २० षटकात केवळ १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. सामना संपल्यानंतर धोनीने पराभवाचे कारण सांगितले.
या सामन्यातील पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या वक्तव्यात निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, “ही धावसंख्या अपेक्षेपेक्षा थोडी जास्त होती. गोलंदाजीच्या वेळी आम्ही पहिल्या ६ षटकात जास्त धावा दिल्या. त्यावेळी या विकेटवर फलंदाजी करणेही सोपे होते. यानंतर आमच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये निश्चितच पुनरागमन केले, परंतु त्यादरम्यान असे अनेक चौकार गेले जे जायला नको होते.”
धोनीने पथिरानाच्या गोलंदाजीचा बचाव करताना यशस्वी आणि जुरेलचे कौतुक केले –
धोनीने पथिरानाच्या गोलंदाजीचा बचाव केला. तो म्हणाला, ”पथिरानाची गोलंदाजी चांगली होती, त्याने वाईट गोलंदाजी केली नाही. मला वाटते की त्याने किती चांगली गोलंदाजी केली हे स्कोअरकार्ड दर्शवत नाही. यशस्वीने चांगली फलंदाजी केली, गोलंदाजांचा पाठलाग करणे आणि जोखीम पत्करणे हे महत्त्वाचे होते. जुरेलने डावाच्या शेवटी चांगली फलंदाजी केली.”
१८३ धावा केल्याने मला आणखी एक वर्ष मिळाले –
जयपूरचे मैदान अतिशय खास असल्याचे वर्णन करताना धोनी म्हणाला, “हे खूप खास ठिकाण आहे, विझागमधील माझे पहिले एकदिवसीय शतक, ज्यामुळे मला १० सामने मिळाले. परंतु मी येथे केलेल्या १८३ धावांनी मला आणखी एक वर्ष मिळाले. इथे परत येऊन खूप छान वाटलं.” भारताच्या श्रीलंका दौऱ्यात ३१ ऑक्टोबर २००५ रोजी जयपूरमध्ये धोनीने टीम इंडियाला १८३ धावा करून शानदार विजय मिळवून दिला होता. या खेळीत त्याने १५ चौकार, १० षटकार मारले. त्यावेळी राहुल द्रविड कर्णधार होता.