करोनामुळे तब्बल ५ महिने बंद असलेलं क्रिकेट ऑगस्ट महिन्यात पुन्हा सुरू झालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर कॅरेबियन बेटांवर संपूर्ण टी२० स्पर्धादेखील सुखरूप पार पडली. आता जगभरातील सर्वात लोकप्रिय अशा IPL स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. यंदाचे IPL इतर स्पर्धांपेक्षा वेगळं असणार आहे. याचं कारण यंदा IPLचा संपूर्ण हंगाम भारताबाहेर युएईमध्ये खेळला जाणार आहे. तसेच स्टेडियममध्येही प्रेक्षकांच्या जागी केवळ रिकाम्या खुर्च्या असणार आहेत. सुरेश रैना, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्याने स्पर्धेची रंगत काहीशी कमी झाली आहे. पण IPLचं मुख्य आकर्षण, सर्वांचा चाहता कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी मात्र दीर्घ काळच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरणार आहे.
२०१९च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर धोनीने दीर्घ विश्रांती घेतली. मधल्या काळात काही वेळा धोनीला पुनरागमनाची संधी होती. पण काही वेळा धोनीने संधी नाकारली तर काही वेळा संघ व्यवस्थापनाने त्याला नकार कळवला. त्यातच IPL आणि नंतर T20WorldCup पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय यामुळे धोनी अखेर १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण IPLमध्ये तो खेळत राहणार असल्याने चाहत्यांना हायसं वाटलं. त्यानुसार आता तब्बल ४३६ दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर धोनी अखेर आज मैदानावर उतरताना दिसणार आहे.
Delayed by a pandemic, shifted by time zones, united by all your #yellove. Finally it’s time to #StartTheWhistles! #WhistlePodu #Yellove #MIvCSK #Dream11IPL pic.twitter.com/X0g4DHPqx9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 19, 2020
कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाविरोधात धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबई संघातील लसिथ मलिंगाची अनुपस्थिती तर चेन्नईच्या संघातील सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांची माघार यामुळे दोन्ही संघांच्या खेळाकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या विजेत्या संघात असलेले कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्होदेखील एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये १७-११ असे मुंबईचे पारडे जड आहे. पण क्रिकेटमध्ये काहीही सांगणं कठीण असतं त्यामुळे आज होणाऱ्या मूळ सामन्याकडेच साऱ्यांचे लक्ष असणार आहे.