Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: धोनी आणि त्याचे डीआरएस यांच एक वेगळंच कनेक्शन आहे. धोनीने घेतलेले रिव्ह्यू नेहमीच अचूक राहिले आहेत. विकेटकीपर म्हणून धोनी यष्टीमागे उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे. त्यामुळे धोनी जेव्हा रिव्ह्यू घेतो तेव्हा त्याला धोनी रिव्ह्यू सिस्टम असे म्हटले जाते. धोनीच्या या रिव्ह्यूची पुन्हा एक झलक पाहायला मिळाली. लखनऊविरूद्धच्या सामन्यात धोनीने रिव्ह्यू घेतला आणि पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.
तुषार देशपांडेने टाकलेला १३व्या षटकातील शेवटचा चेंडू पंचांनी वाईड म्हणून घोषित केला, पण त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. शतकवीर मार्कस स्टॉइनस क्रीजवर होता आणि तुषार त्याच्यासमोर गोलंदाजी करत होता. चेंडू बॅटच्या बाजूने जाताच, पंचांनी चेंडू वाइड असल्याचा इशारा केला. यावर धोनीने लगेच डीआरएसचे संकेत दिले.
पंचांना त्याच्या इशाऱ्यानंतर रिव्ह्यू घ्यावा लागला आणि तिसऱ्या पंचांनी फील्ड अंपायरला आपला निर्णय बदलण्यास सांगितले. मार्कस स्टॉइनस मैदानाकडे बघतच राहिला. पंचांनी आपला निर्णय बदलताच सोशल मीडियावर ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ मीम्सचा पूर आला. धोनीने रिव्ह्यू घेतला की पंचांनी निर्णय बदलावाच, अशा अनेक पोस्टही चाहत्यांनी केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जने ४ बाद २१० धावा केल्या. चेन्नईच्या कर्णधार ऋतुराजने ६० चेंडूंत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सने ४ गडी गमावत २१३ धावा केल्या आणि अखेरच्या षटकात ६ विकेट आणि ३ चेंडू राखून विजय मिळवला. लखनऊसाठी मार्कस स्टॉइनसने ६३ चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १२४ धावा केल्या, तर निकोलस पूरनने १५ चेंडूत ३४ धावा आणि दीपक हुडाने ६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचून नाबाद १७ धावा केल्या.