IPL 2025 MS Dhoni Deepak Chahar Video: आयपीएल २०२५ मधील रिव्हेंज विकमध्ये आज म्हणजेच २० एप्रिलला मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलमधील एल क्लासिको सामन्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. पण या सामन्यापूर्वी सराव करतानाचे दोन्ही संघातील खेळाडूंचे फोटो, व्हीडिओ समोर आले आहेत. त्यापैकी धोनी आणि चहरचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या दीपक चहरला मेगा लिलावापूर्वी रिलीज करण्यात आले होते. यानंतर लिलावात दीपक चहरला मुंबई इंडियन्सने संघात सामील केलं. आता नवीन हंगामात, मुंबई इंडियन्सकडून खेळणारा दीपक चहर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा धोनीला चिडवताना दिसतो. रविवारच्या सामन्यापूर्वी, एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये त्याने चेन्नईच्या माजी कर्णधाराला इतका त्रास दिला की तो त्याला मारण्यासाठी बॅट घेऊन त्याच्याकडे धावला.

शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा कर्णधार एमएस धोनी मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरबरोबर मस्ती करताना दिसला. २०१८ ते २०२४ पर्यंत चेन्नईसाठी आयपीएल खेळलेला दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून चेन्नईविरूद्ध पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. सराव सत्रादरम्यान चहर धोनीला त्रास देताना दिसत होता, धोनी इतका वैतागला की तो बॅट घेऊन त्याला मारण्यासाठी धावला.

चेपॉकमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात दीपक चहरने एमएस धोनीला स्लेजिंग केलं होतं. धोनी फलंदाजीला येताच चहर टाळ्या वाजवत आला आणि धोनीला सातत्याने काहीतरी बोलताना दिसला. धोनीने सामन्यानंतर या स्लेजिंगचं आपल्या अंदाजात उत्तर दिलं. धोनीने सामन्यानंतर हात मिळवताना चहरला बॅटने फटका दिला होता. ज्याचा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

चेन्नई सुपर किंग्जने नवीन हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयाने केली होती. यानंतर संघाला सलग ५ पराभवांना सामोरे जावे लागले. संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि पुन्हा एकदा कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीला देण्यात आले. पण आता रिव्हेंज विकमधील या आठवड्यात मुंबई इंडियन्स मोसमातील पहिल्या पराभवाचा बदला घेणार का यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.