MS Dhoni Retirement: टीम इंडिया आणि चन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीला, यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंच्या नाराजीचाही समाना करावा लागत आहे. धोनी यष्टीरक्षणात अविश्वसनीय कामगिरी करत असला तरी, त्याला फलंदाजीत काही खास करता आलेले नाही. जगातील सर्वोत्तम फिनशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला आपल्या फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला एकही सामना जिंकून देता आलेला नाही.
याचबरोबर धोनीला फलंदाजी क्रमांकावरूनही त्याच्यासह चेन्नई संघ व्यवस्थापनालाही टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान काल दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही धोनीने तब्बल २६ चेंडू खेळून अवघ्या ३० धावाच केल्या. त्यामुळे त्याच्या फंलदाजीच्या क्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
दरम्यान धोनीच्या फलंदाजीतील सुमार कामगिरीनंतर भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारी याने स्पष्टपणे म्हटले आहे की, धोनीने दोन वर्षांपूर्वीच आयपीएलमधून निवृत्ती घ्यायला हवी होती.
चाहते पाहू शकत नाहीत
“मी थोडे कठोर बोलतो पण, मला माफ करा. २०२३ च्या आयपीएलनंतर धोनीने निवृत्ती घ्यायला हवी होती. तो त्याचा सर्वोत्तम काळ होता. गेल्या अनेक वर्षांपासून धोनीने खूप आदर कमावला आहे. पण, गेल्या दोन वर्षांतील त्याची कामगिरी आता चाहते पाहू शकत नाहीत. चेन्नईचे चाहते रस्त्यावर येऊन याबाबत बोलतही आहेत,” असे क्रिकबझवरील चॅटमध्ये बोलताना मनोज तिवारी म्हणाला.
धोनीला समजावून सांगा की…
“चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने म्हटले आहे की, धोनी १० षटकांपेक्षा जास्त फलंदाजी करू शकत नाही. पण मला समजत नाही की जेव्हा तुम्ही २० षटकांपेक्षा जास्त क्षेत्ररक्षण करू शकता, जिथे तुम्हाला सतत हालचाल करावी लागते, झेल घेण्यासाठी सूर मारावे लागतात, रनआउट करावे लागतात, तेव्हा तुमच्या गुडघ्याला इजा होत नाही, परंतु जेव्हा संघाला जिंकण्यास मदत करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही गुडघ्याच्या दुखापतीबद्दल बोलता. मला वाटते की त्यांनी कठोर निर्णय घ्यावा आणि त्याला समजावून सांगावे की, आता तुझी कामगिरी होत नाही, तू आता थांबावे”, असेही तिवारीने पुढे म्हटले आहे.
दरम्यान काल दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला आपल्या बालेकिल्यांत १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. आयपीएलची पाच विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा यंदाच्या हंगामातील हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. त्यामुळे धोनीवर त्याच्या फलंदाजीमुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.