Harbhajan Singh Statement on MS Dhoni : आयपीएल २०२४ मधील ५३व्या सामन्यात रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा २८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीएसके संघाने ९ गडी गमावून १६७ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात ९ बाद १३९ धावाच करु शकला. चेन्नईच्या या विजयात ४३ धावा करणारा रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याचवेळी या सामन्यात महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे अपयशी ठरला. यानंतर माजी खेळाडू हरभजन सिंगने माहीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.
भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगनेही महेंद्रसिंग धोनीला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या महेंद्रसिंग धोनीला पहिल्याच चेंडूवर वैयक्तिक शून्य धावसंख्येवर हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले. यानंतर हरभजन सिंगने धोनीच्या ९व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
हरभजनने धोनीला न खेळण्याचा दिला सल्ला –
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांना महेंद्रसिंग धोनीच्या अगोदर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. माही नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला, त्यामुळे हरभजन सिंग खूपच नाराज दिसला. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “महेंद्रसिंग धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल, तर त्याने खेळू नये. त्याच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाजाचा समावेश केला, तर ते योग्य ठरेल. माही निर्णय घेणारा माणूस आहे आणि त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला न आल्याने आपल्या संघाची निराशा केली आहे.”
हेही वाचा – IPL 2024: कोलकाताचा लखनऊवर मोठा विजय, ९८ धावांच्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी
धोनीच्या संमतीशिवाय काहीही होत नाही –
माजी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला, “शार्दुल ठाकूर कधीही महेंद्रसिंग धोनीसारखे फटके मारू शकत नाही. त्यामुळे धोनीने ही चूक का केली हे मला समजत नाही. त्याच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही आणि फलंदाजी क्रमवारीत बदल करण्याचा हा निर्णय दुसऱ्या कोणीतरी घेतला यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही. धोनीने गेल्या काही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी झटपट धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला याच गोष्टीची गरज होती.”