IPL 2025 MS Dhoni on Player of The Match Award LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्स संघाने पराभवाची मालिका संपवत अखेरीस विजयाला गवसणी घातली आहे. लखनौ सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात चेन्नईने लखनौमध्ये ५ विकेट्सने विजय नोंदवत यंदाच्या मोसमातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. धोनीने अखेरच्या षटकांमध्ये येऊन उत्कृष्ट फटकबाजी करत संघाचा विजय निश्चित केला. धोनीला या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. पण सामन्यानंतर धोनीच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं.

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्सने २० षटकांत ७ गडी गमावून १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेने १९.३ षटकांत ५ गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली आणि मॅचविनिंग खेळी केली. शिवम दुबेने देखील धोनीला चांगली साथ देत संघाला विजयापर्यंत नेले.

यापूर्वी गोलंदाजी करताना धोनीने विकेटमागे कमालीची विकेटकिपिंग केली. धोनीने आधी आयुष बदोनीला विकेटमागे चेंडू टिपत शानदार स्टम्पिंग केली. याशिवाय ऋषभ पंतलाही धोनीनं झेलबाद केलं. तर अखेरच्या षटकात धोनीने अब्दुलला समदला केलेलं रनआऊट कमालीचं होतं. ज्यामुळे अखेरच्या षटकात लखनौला धावा करता आल्या नाहीत.

सामन्यादरम्यान, सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर आयुष बदोनीला यष्टीचीत करून आयपीएलमधील त्याचा २०० वा विकेट घेतला, विकेटच्या मागे राहून २०० खेळाडूंना बाद करणारा तो पहिला आयपीएलमधील खेळाडू ठरला आहे. दिनेश कार्तिक आणि वृद्धिमान साहा या यादीत आहेत, पण ते धोनीच्या खूप मागे आहेत.

तर फलंदाजीत संघाला विजयासाठी ३० चेंडूत ५५ धावांची आवश्यकता असताना महेंद्रसिंग धोनी क्रीजवर आला. पण त्यानंतर धोनीने अशी खेळी केली की सामन्याचा रोख बदलला. त्याने फक्त ११ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह २६ धावांची नाबाद खेळी केली. धोनीने एकमेव षटकार एका हाताने मारला. त्याने शिवम दुबेसह २७ चेंडूत ५६ धावांची भागीदारी केली. शिवमने ३७ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ४३ धावांची नाबाद खेळी केली. सीएसकेचा हा ७ सामन्यांतील दुसरा विजय आहे. पण संघ अजूनही गुणतालिकेत अखेरच्या स्थानीच आहे.

धोनीने संघाच्या विजयानंतर संघाच्या कामगिरीवर आणि विजयाबाबत वक्तव्य केलं. फलंदाजी युनिटकडून अजून चांगल्या कामगिरीचं अपेक्षा असल्याचं धोनी म्हणाला. यानंतर धोनीला विचारण्यात आलं की, ‘तू यापूर्वी अखेरचा आयपीएलमध्ये कधी सामनावीराचा पुरस्कार जिंकला होतास आठवतंय का?’ यावर धोनी म्हणाला की, “मला आजही कळतं नाहीये की हे लोक मला का हा पुरस्कार देतायत? नूरने चांगली गोलंदाजी केली होती. जडेजाने देखील चांगली गोलंदाजी केली होती.”

धोनीने या आधी २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरूद्ध अखेरचा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. याशिवाय धोनी आयपीएलमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावणाारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. धोनीने वयाच्या ४३ वर्षी हा पुरस्कार मिळवला.