IPL 2025 CSK vs RCB MS Dhoni Stumping: आरसीबी वि. सीएसके हा आयपीएलमधील अजून एक अटीतटीचा सामना चेपॉकच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर बंगळुरूचा संघ फलंदाजीला उतरला आहे आणि आरसीबीने दणदणीत सुरूवात केली आहे. पण धोनीने विकेटच्या मागून संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे.
४३ वर्षांच्या धोनीने आपल्या चपळाईने अजून एक स्टम्पिंग करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सूर्यकुमार यादवला चमत्कारिकरित्या स्टंपिंग केल्यानंतर धोनीने आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पुन्हा एकदा चपळतेने स्टम्पिंग केलं. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
आरसीबीचा सलामीवीर फिल सॉल्टला धोनीने अप्रतिम स्टम्पिंग करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. ५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॉल्टने आपली विकेट गमावली. धोनीने नूर अहमदच्या गुगलीवर सॉल्टला स्टम्पिंग केलं. धोनीने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवलाही नूर अहमदच्या गोलंदाजीवरच बाद केलं.
फिल सॉल्टने ५ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने शानदार फलंदाजी केली. पण त्याच्या डावाच्या १६व्या चेंडूवर नूर अहमदने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर फटका मारला. शॉट खेळल्यानंतर सॉल्टने त्याचा पाय थोडा वर उचलला आणि तितक्यात धोनीने बेल्स उडवले. धोनीने पुन्हा एकदा त्याच्या चपळाईने सॉल्ट आणि विराटला चकित केलं. अगदी काही सेकंदांच्या फरकाने सॉल्ट स्टम्पिंग होत बाद झाला.
आरसीबीने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजीसाठी उतरला. आरसीबीकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने वादळी फलंदाजी करत पॉवरप्लेमध्ये १ बाद ५६ धावा केल्या आहेत. सॉल्ट १६ चेंडूत ३२ धावा करत बाद झाला. यानंतर देवदत्त पडिक्कलने वादळी फटकेबाजी करत संघाला १० षटकांत ९३ धावांवर नेऊन ठेवले.