देशाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देणारा, शांतचित्ताने आपले काम करणारा एक कर्णधार तर दुसरा आक्रमकपणे ‘अरे ला, कारे’ म्हणून जवाब देणारा. हे दोन्ही कर्णधार जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ‘क्वॉलिफायर-२’चा सामना खेळवण्यात येणार असून यामध्ये ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ तर दुसरीकडे ‘अँग्री यंग मॅन’ असलेल्या विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
या दोन्ही संघांमध्ये साखळी फेरीत दोन सामने झाले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये चेन्नईने बंगळुरूला पराभूत केले होते. पण सध्याच्या घडीला चेन्नईचे मनोबल खचलेले असेल, कारण ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यामध्ये त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. पण आयपीएलमध्ये चेन्नईची कामगिरी सातत्याने चांगली होताना दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत पाच स्पर्धामध्ये अंतिम फेरी गाठली असून २०१० आणि २०११ साली त्यांनी जेतेपदही पटकावले आहे.
गेल्या सामन्यात मुंबईच्या सलामीवीरांनी चेन्नईच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. पण त्यानंतर मात्र त्यांनी सामन्यात पुनरागमन करत मुंबईला दोनशे धावांपर्यंत जाण्यापासून रोखले होते. कोणत्याही सामन्यात पुनरागमन करण्याची क्षमता चेन्नईच्या संघात आहे. गोलंदाजीमध्ये ड्वेन ब्राव्हो आणि आशीष नेहरा सातत्याने भेदक मारा करताना दिसत आहे. फलंदाजीमध्ये सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलमची उणीव त्यांना नक्कीच जाणवत असली तरी त्याच्या जागी संघात दाखल झालेला माइक हसी हादेखील दर्जेदार फलंदाज आहे. महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.
बंगळुरूचा संघ यशा-अपयशाच्या पायऱ्यांवरून इथपर्यंत पोहोचला आहे. ख्रिस गेल, विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स या तिन्ही फलंदाजांकडे एकहाती सामना फिरवण्याची धमक आहे. गोलंदाजीमध्ये बंगळुरूची सांघिक कामगिरी नेत्रदीपक होत आहे. मिचेल स्टार्कसारखा वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे असून त्याला श्रीनाथ अरविंद, डेव्हिड वाइज, हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल यांची चांगली साथ मिळत आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर कागदावर चेन्नईचा संघ बंगळुरूपेक्षा सरस आहे. पण कामगिरीचा विचार केला तर गेल्या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर चेन्नईपेक्षा बंगळुरूचे मनोबल उंचावलेले असेल.
वेळ : रात्री ८.०० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स आणि सोनी सिक्स वाहिनीवर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा