Dhoni’s 200th match as CSK captain: आयपीएल २०२३ मधील आज १७ वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीसाठी हा सामना खूप खास असणार आहे. कारण तो लीगमध्ये २००व्यांदा संघाचे नेतृत्व करणार आहे. सामन्याच्या आधी, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) अष्टपैलू रवींद्र जडेजाने कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले. त्याचबरोबर आशा व्यक्त केली की, चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर विजयाच्या रूपात संघ त्याला हे विशेष यश भेट देईल.
एमएस धोनीच्या विक्रमांबद्दल बोलताना, अष्टपैलू रवींद्र जडेजा म्हणाला की भारताचा माजी कर्णधार हा केवळ सीएसकेचाच नाही तर भारतीय क्रिकेटचाही एक दिग्गज आहे. तो म्हणाला की कर्णधार म्हणून २०० व्या सामन्यात धोनीसाठी आरआरविरुद्ध विजय ही सर्वोत्तम भेट असेल. एमएस धोनी आयपीएलमध्ये २०० वेळा संघाचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार होण्याच्या अगदी जवळ आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या नाणेफेकीसाठी बाहेर पडताच तो इतिहास रचणार आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आतापर्यंत कोणीही १५० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलेले नाही. या यादीत ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. कर्णधार म्हणून त्याने १४६ सामन्यांचे नेतृत्व केले आहे.
चेन्नईतील मोठ्या सामन्यापूर्वी रवींद्र जडेजा पत्रकार परिषदेत म्हणाला, “मी काय सांगू? तो भारतीय क्रिकेटचा दिग्गज आहे. म्हणूनच मी त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. आशा आहे की चेपॉक येथील त्याच्या २०० व्या सामन्यात आम्ही जिंकू आणि सर्व चाहते आनंदी होतील. आम्ही विजयी घोडदौड कायम राखू शकू. आशा आहे की उद्या (बुधवार) आम्ही जिंकू आणि कर्णधार म्हणून आम्ही त्याला त्याच्या २००व्या (आयपीएल) सामना भेट देऊ.”
हेही वाचा – IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने आपलाच लाजिरवाणा विक्रम केला मजबूत; २५ व्यांदा नोंदवला ‘हा’ नकोसा कारनामा
एमएस धोनीने आयपीएलमध्ये २३६ सामने खेळले आहेत, त्यापैकी २१३ वेळा त्याने कर्णधारपद भूषवले आहे. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त, एमएस धोनीने एका हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले आहे. धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १२५ सामने जिंकले आहेत आणि ८७ सामने गमावले आहेत.