Suryakumar Yadav Shreyas Iyer Will Play In T20 Mumbai League: सध्या भारतात आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. केवळ भारतातील नव्हे, तर जगभरातील खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसून येत आहेत. भारतीय संघातील खेळाडू आयपीएल वगळता कुठलीही लीग स्पर्धा खेळत नाहीत. मात्र, आयपीएल झाल्यानंतर भारतीय संघातील स्टार खेळाडू मुंबईत होणाऱ्या टी-२० मुंबई लीग स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात. मुंबईकडून खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना ही लीग स्पर्धा खेळावी लागेल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेचा फॉरमॅट हा आयपीएल स्पर्धेसारखाच असतो. तसेच स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातात. यापूर्वी खेळाडूंना ही स्पर्धा खेळण्यासाठी नाव नोंदणी करावी लागायची. त्यानंतर खेळाडूंवर बोली लावली जायची आणि मग ते खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी पात्र ठरायचे. मात्र, आता मुंबई क्रिेकेट असोसिएशनने मोठे पाऊल उचलले आहे. मुंबईकडून खेळणाऱ्या खेळाडूंना ही स्पर्धा खेळणे अनिवार्य असणार आहे.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर हे स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. यापैकी ज्या खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होणार नाही, त्या खेळाडूंना ही स्पर्धा खेळणं अनिवार्य असणार आहे. रोहित शर्माकडेही विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आयपीएल खेळणारे खेळाडू एकाच हंगामात कोट्यवधींची कमाई करतात. आता टी-२० मुंबई लीग स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पाडला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यासोबतच लिलावात जितकी बोली लावली जाईल, ती रक्कमही खेळाडूंना दिली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची बेस प्राईज किती असेल, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या स्पर्धेसाठी आतापर्यंत २,८०० खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत. या स्पर्धेला येत्या २६ मेपासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना ५ जून रोजी होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयामुळे मुंबईतील युवा खेळाडूंना भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, कोणते खेळाडू खेळतील आणि कोणते खेळाडू खेळण्यासाठी नकार देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.