विजयाच्या अश्वमेधावर आरूढ झालेल्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये चुरस रंगेल ती अव्वल क्रमांक गाठण्याची. एकीकडे घरच्या मैदानात बलाढय़ मुंबईला नमवण्यासाठी राहुल द्रविडची सेना सज्ज असेल, तर राजस्थानवर ‘रॉयल’ विजय साकारण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील असेल.
दोन्ही संघांनी चार सामन्यांमध्ये तीन सामने जिंकले आहेत, तर त्यांना एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांचे समान गुण असले तरी धावगतीच्या आधारावर मुंबई अव्वल स्थानावर आहे, तर राजस्थान सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोघांमधील जो संघ बुधवारचा सामना जिंकेल त्याला अव्वल स्थानावर पोहोचण्याची नामी संधी असेल.
सचिन तेंडुलकर आणि कर्णधार रिकी पाँटिंग हे दोन महान खेळाडू मुंबईच्या संघाची शान आहेत. पण अजूनपर्यंत त्यांना लौकिकाला साजेशी खेळी साकारता आलेली नाही. त्यांना दोनदा अर्धशतकी सलामी दिली असली तरी यापैकी एकालाही अर्धशतक झळकावता आले नाही. या दोघांवरच मुंबईचा संघ अवलंबून नाही.
दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्मात असून रोहित शर्मालाही चांगला सूर गवसला आहे. त्याचबरोबर किरॉन पोलार्ड हा एकहाती सामना तडाखेबंद फलंदाज संघात आहे. अंबाती रायुडू हा गुणवान युवा फलंदाज असला तरी त्याला आतापर्यंत सूर गवसलेला नाही. गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगा हे प्रमुख अस्त्र आहे. त्याला मिचेल जॉन्सन, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग आणि पोलार्ड यांची साथ मिळेल.
कर्णधार द्रविड आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर फलंदाजीची मुख्यत्वेकरून भिस्त असेल. शेन वॉटसनला अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. पण ब्रॅड हॉज आणि केव्हिन कुपर संघासाठी प्रत्येक वेळी धावून येत आहेत. पण जर राजस्थानचे पहिले चार फलंदाज झटपट बाद झाले तर मात्र त्यांना जास्त धावा करता येणार नाहीत. गोलंदाजीमध्ये कुपरबरोबर शॉन टेट, सिद्धार्थ त्रिवेदी हे चांगली गोलंदाजी करत आहेत.
दोन्ही संघांचा विचार केला तर राजस्थानपेक्षा नक्कीच मुंबईचा संघ सरस दिसत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मुंबईचा संघ वरचढ आहे. पण दुसरीकडे बलाढय़ संघाला धक्का देण्याची कुवत राजस्थानमध्ये नक्कीच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा