मुंबई इंडियन्ससाठी पराभवाची मालिका संपण्याची चिन्हं नाहीत. लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवरही मुंबईला पराभवाचाच सामना करावा लागला. पराभवानंतर बोलताना मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने पॉवरप्लेमध्ये विकेट्स गमावणं पराभवाचं कारण ठरल्याची कबुली दिली. हार्दिकच्या बोलण्याचा रोख फलंदाजांच्या दिशेने म्हणजेच रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांच्या दिशेने होता.

लखनऊविरुद्ध पराभवानंतर बोलताना हार्दिक म्हणाला, ‘बॅटिंग पॉवरप्लेदरम्यान विकेट्स गमावणं आमच्यासाठी नुकसानदायी ठरलं आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट्स गमावल्या तर त्यातून सावरुन मोठी धावसंख्या रचणं कठीण होतं. जिथे आम्ही सर्वोत्तम खेळ करायला हवा होता, तिथे आम्ही कमी पडलो’.

पहिल्यांदा बॅटिंग करताना फलंदाजांवर मोठी धावसंख्या उभारण्याचं दडपण आहे का? कारण सातत्याने संघ २०० धावांची वेस ओलांडत आहेत. यावर हार्दिक म्हणाला, ‘मला असं वाटत नाही. चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं आणि वाईट चेंडूंना पिटाळणं हे कुठल्याही सामन्यात करावं लागतं. खेळपट्टी चांगली होती. फटके खेळण्यासाठी पोषक अशी परिस्थिती होती पण आम्ही त्याचा फायदा उठवू शकलो नाही. हा आमच्यासाठी विचित्र असा हंगाम आहे’.

तो पुढे म्हणाला, ‘मैदानात खेळायला उतरता तेव्हा काही दिवस तुमचे असतात, काही दिवस तुमचे नसतात. कामगिरीत चढउतार सुरूच राहतात. तुम्हाला संघर्ष करत राहावं लागतं. या सामन्यात आम्ही लौकिकाला साजेसा खेळ करू शकलो नाही पण या पराभवातूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. नेहल वढेरा सातत्याने चांगला खेळतो आहे. राजस्थानविरुद्ध आणि लखनऊविरुद्धही तो सुरेख खेळला. तो गेल्या हंगामातही उत्तम खेळला होता. संघ समीकरणामुळे नेहल सुरुवातीच्या काही सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्यातली गुणवत्ता पाहता तो अनेक वर्ष मुंबई इंडियन्ससाठी खेळेल याची खात्री वाटते आणि भविष्यात भारतासाठीही खेळेल अशी आशा आहे’.

यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पंड्याकडे सोपवली. रोहितचं वय, दुखापती आणि फॉर्म हे सगळं लक्षात घेऊन मुंबई संघव्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. पण चाहत्यांना हा निर्णय पसंत पडला नाही. हार्दिकला मैदानात आणि सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. चाहत्यांसाठी रोहित अत्यंत लाडका आहे. मुंबईच्या कर्णधारपदावरून असा पद्धतीने बाजूला करणं चाहत्यांना आवडलं नाही आणि त्यांना ट्रोलिंगचं हत्यार उपसलं.

मंगळवारी झालेल्या लढतीत लखनऊने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. संथ खेळपट्टीचा फायदा उठवत लखनऊच्या गोलंदाजांनी मुंबईला १४४ धावांतच रोखलं. मुंबईकडून नेहल वढेराने ४६ तर टीम डेव्हिडने ३५ धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. वाढदिवसाच्या दिवशी रोहित शर्मा ४ धावा करुन तंबूत परतला. मोहसीन खानने त्याला बाद केलं. इशान किशनने ३२ धावांची खेळी केली पण या खेळीदरम्यान तो चाचपडताना दिसला. सूर्यकुमार यादवकडून मुंबईला मोठ्या अपेक्षा होत्या पण मार्कस स्टॉइनसने त्याला माघारी धाडलं. त्याने १० धावा केल्या. युवा तिलक वर्मा या सामन्यात अपयशी ठरला. त्याने ७ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या भोपळाही न फोडता तंबूत परतला. नेहल वेढराने चिवटपणे झुंज देत खेळी केल्याने मुंबईला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. लखनऊकडून मोहसीन खानने २ तर स्टॉइनस, नवीन उल हक, मयंक यादव, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट्स पटकावली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लखनऊला हे लक्ष्य गाठताना संघर्ष करावा लागला. स्टॉइनसने ४५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. कर्णधार के.एल.राहुलने २८ धावा केल्या. स्टॉइनस बाद झाल्यानंतर लखनऊची धावगती मंदावली. पण अनुभवी निकोलस पूरनने नाबाद १८ धावा करत लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या पराभवामुळे मुंबईच्या बाद फेरीच्या आशा मावळत चालल्या आहेत. मुंबईने यंदाच्या हंगामात १० सामने खेळले असून केवळ ३ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. ७ लढतीत पराभव पदरी पडल्याने मुंबईसाठी प्लेऑफमध्ये आगेकूच करणं गणितीय समीकरणांवर अवलंबून असणार आहे.

Story img Loader