Mumbai Indians Records In IPL: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना या संघाने पाच वेळेस आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. गेल्या हंगामात या संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईला गेल्या हंगामात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र, या हंगामात मुंबईने चांगला पिकअप घेतला आहे. आज लखनऊला पराभूत करत मुंबईने टॉप २ मध्ये प्रवेश केला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
आयपीएलमध्ये असा रेकॉर्ड करणारा मुंबई इंडियन्स एकमेव संघ
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकअखेर २१५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सचा डाव १६१ धावांवर आटोपला. यासह मुंबईने हा सामना ५४ धावांनी आपल्या नावावर केला. हा विजय मुंबईसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण हा मुंबईचा या स्पर्धेच्या इतिहासातील १५० वा विजय ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही संघाला असा कारनामा करता आलेला नाही.
मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकून गुणतालिकेत टॉप २ मध्ये प्रवेश केला. यासह हा मुंबईचा या स्पर्धेतील १५० वा विजय ठरला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नईने १४० सामने जिंकले आहेत. चेन्नईची विजयाची सरासरी ५६.४५ इतकी आहे. तर मुंबईची विजयाची सासरी ही ५४.२४ इतकी आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप ३ संघ
मुंबई इंडियन्स – १५० सामने*
चेन्नई सुपर किंग्ज – १४० सामने
कोलकाता नाईट रायडर्स – १३३ सामने
मुंबईचा शानदार विजय
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून रायन रिकल्टनने शानदार सुरूवात करून देत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवनेही लखनऊच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोन्ही फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने २० षटकअखेर २१५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संपूर्ण डाव अवघ्या १६१ धावांवर आटोपला. यासह मुंबईने हा सामना ५४ धावांनी आपल्या नावावर केला. हा सामना जिंकून मुंबईने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.