Mumbai Indians New Jersey Launch Video: आयपीएल २०२५ येत्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात ईडन गार्डन्सवर होणार आहे. दरम्यान, नवा आयपीएलचा सीझन सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने आपली नवी जर्सी लाँच केली आहे. फ्रँचायझीने जर्सी लाँचचा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ जारी करून चाहत्यांशी शेअर केली. कॅप्टन हार्दिकने व्हिडीओमध्ये चाहत्यांना भावनिक संदेशही दिला आहे.

पंड्याने संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यासह फ्रँचायझीचा वारसा पुढे नेण्याविषयी या व्हीडिओमध्ये म्हटले आहे. जर्सी लाँच झाल्याची बातमी मुंबई इंडियन्सने एका व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. या व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, प्रिय पलटन, मागील सीझन संघासाठी फारसा चांगला नव्हता. पण आता नवा सीझन येत आहे. या संघाचा वारसा परत आणण्याची संधी २०२५ च्या सीझन घेऊन येत आहे.

पुढे हार्दिक म्हणाला, निळा आणि सोनेरी रंगाच्या जर्सी परिधान करत आम्ही मैदानावर उतरून मुंबईच्या स्पिरिटप्रमाणे खेळणार आहोत. ही फक्त जर्सी नाहीय, हे तुम्हा चाहत्यांसाठी एक वचन आहे. चला भेटू वानखेडेवर.

मुंबईची नवी जर्सी खूप कमाल दिसत आहे. संघाच्या जर्सीमध्ये नेहमीप्रमाणे निळा आणि सोनेरी रंग आहे. जर्सीच्या उजव्या बाजूला प्रायोजकांचा लोगो आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा लोगो डाव्या बाजूला दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंनी या जर्सीमध्ये त्यांचे फोटोशूटही केले आहे. तर मध्यभागी किट पाटर्नसचा लोगो आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या दोन संघांमध्ये नेहमीच चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. २०२५ च्या सुरूवातीलाच पुन्हा एकदा रोमांचक सामन्याची चाहत्यांना अपेक्षा असेल. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी मोठे टेन्शन असणार आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर मागील सीझनच्या अखेरच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली असून त्यामुळे तो या सामन्यातून खेळताना दिसणार नाही. आता या सामन्यासाठी कर्णधारपद कोणाला मिळते यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

Story img Loader