अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार लढत देऊनही दुर्दैवाने मुंबई इंडियन्सला सलामीच्याच सामन्यात निराशा पदरी पडली, परंतु शनिवारी मुंबईची गाठ पडणार आहे ती दोन वेळा आयपीएल विजेत्या बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जशी. घरच्या मैदानावर सहाव्या पर्वात विजयी सलामी नोंदवण्याची उत्सुकता चेन्नईलाही आहे.
शुक्रवारी रात्री मुंबईचा संघ विजयासमीप आला होता, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या घशातून घास हिरावला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात मुंबईला फक्त २ धावांनी पराभव पत्करावा लागला.
आयपीएलच्या बाजारपेठेत यशस्वी संघ म्हणून बिरूद मिरविणाऱ्या चेन्नईने २०१० आणि २०११मध्ये जेतेपदाचा मान संपादन केला होता. त्या पाश्र्वभूमीवर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाची शनिवारी अग्निपरीक्षा ठरणार आहे. या बहुप्रतीक्षित लढतीला सामोरे जाताना मुंबईने या गोष्टीचीही जाणीव ठेवायला हवी की, एम. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईची कामगिरी वर्चस्व दाखवणारी आहे.
चेन्नईला या वेळी अॅल्बी मॉर्केलची अनुपस्थिती जाणवेल. याचप्रमाणे दुखापतींशी झुंजणारा फॅफ डय़ू प्लेसिस प्रारंभीचे काही सामने खेळू शकणार नाही. याशिवाय श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नई खेळण्यास मनाई असल्यामुळे यजमानांना न्यूवान कुलसेकरा आणि अकिला धनंजय यांची आवश्यकता भासेल, परंतु याही परिस्थितीत आयपीएलच्या नऊ संघांमध्ये चेन्नईचा संघ सर्वात समतोल आहे.
गेल्या काही हंगामांमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या लढाऊ बाण्याचा प्रत्यय घडविला आहे. याचप्रमाणे मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज सुरेश रैना, सलामीवीर मुरली विजय हे चेन्नईचे यशस्वी तारे आपला करिष्मा दाखविण्यासाठी आतुर आहेत. याचप्रमाणे एस. बद्रीनाथची प्रभावी फलंदाजीही विसरता कामा नये. परदेशी खेळाडूंपैकी मायकेल हसी आणि ड्वेन ब्राव्हो या दोघांच्या खेळाकडे सर्वाचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी विजयात भारताच्या गोलंदाजीचा भार समर्थपणे सांभाळणारे फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा चेन्नईकडे आहेत. याचप्रमाणे डावखुरा फिरकी गोलंदाज शदाब जकातीसुद्धा त्यांच्या संघात आहे. वेगवान गोलंदाजांच्या दोन स्थानांसाठी मात्र बेन हिल्फेन्हॉस, डर्क नेन्स, जेसन होल्डर आणि बेन लॉघलिन यांच्यात चुरस असेल.
समकालीन क्रिकेटमधील दोन सर्वोत्तम फलंदाज सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग मुंबई इंडियन्स संघात आहेत. दोघेही अनुभवी फलंदाज मुंबईच्या सलामीचा भार सांभाळत आहेत. दिमाखात फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला दडपण आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कोणत्याही संघाशी सामोरे जाण्याची अष्टपैलू धमक मुंबई इंडियन्सकडे आहे, परंतु संघाची बांधणी पहिल्या सामन्यात सक्षमपणे दिसली नाही. या पाश्र्वभूमीवर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्डला आघाडीच्या फळीत फलंदाजीची संधी मिळू शकेल. रोहित शर्मा, यष्टीरक्षक दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीचा भार असेल.
हमसे ना टकराना!
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार लढत देऊनही दुर्दैवाने मुंबई इंडियन्सला सलामीच्याच सामन्यात निराशा पदरी पडली, परंतु शनिवारी मुंबईची गाठ पडणार आहे ती दोन वेळा आयपीएल विजेत्या बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जशी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-04-2013 at 04:45 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians play against chennai super kings