आयपीएल टी-२० च्या पंधराव्या हंगामाचा थरार येत्या २६ मार्चपासून सुरु होणार आहे. यंदाची ट्रॉफी खिशात घालण्यासाठी प्रत्येक संघाने कंबर कसली आहे. मात्र खेळाडूंचे आरोग्य तसेच सध्याचे कोरोना निर्बंध यामुळे संघांना वेगवेगळ्या अडचणी येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांना तर आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही संघातील एक-एक खेळाडू सुरुवातीचा सामना सामना खेळू शकणार नाहीत. त्याचा फटका या दोन्ही संघांना बसण्याची शक्यता आहे.
आयपीएलचा पंधरावा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरु होणार असून पहिली लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स हा संघ आपला पहिला सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाविरोधात खेळणार आहे. चेन्नईमधील मोईन अली तर मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव असे दिग्गज खेळाडू सुरुवातीचा सामना खेळण्याची शक्यता धुसर आहे. मोईन अलीला व्हिजा मिळण्यास अडचणी येत आहेत. तर सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्यामुळे तो पहिला सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.
मोईन अली पाहतोय व्हिजा मिळण्याची वाट
मोईन अलीला भारतात येण्यासाठी व्हिजा मिळत नसल्यामुळे तो चेन्नई संघात उशिराने सामील होणार आहे. त्यामुळे २६ तारखेला होणाऱ्या चेन्नई आणि कोलकाता रायडर्स यांच्यातील सामन्यात मोईन अली सहभागी होणार नाही. चेन्नई सुपरकिंग्जने मोईन अलीला आठ कोटी रुपये देऊन रिटेन केलेलं असून त्याच्या उपस्थितीबद्दल चेन्नई फ्रेंचायजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथन यांनी अधिक माहिती दिलेली आहे. मोईन अलीने व्हिजासाठी २८ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. मात्र अद्याप त्याला व्हिजा मिळालेला नाही. लवकरच तो भारतात येईल असी आशा आहे, असे विश्वनाथन यांनी सांगितलं आहे.
सूर्यकुमारच्या अंगठ्याला दुखापत
तर मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव हादेखील पहिला सामना खेळण्याची शक्यता धुसर आहे. कारण त्याच्या अंगठ्याला दुखापत झालेली असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. सूर्यकुमार यादव अजूनही नॅशनल क्रिकेट अकॅडमी येथे असून त्याला अजून सुट्टी मिळालेली नाही. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळेच सूर्यकुमार श्रीलंकेविरोधातील टी-२० आणि कसोटी मालिकेत सहभाही होऊ शकला नव्हता.
दरम्यान, सूर्यकुमार पहिला सामना खेळू शकणार नसला तरी तो दुसऱ्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स संघ आपला दुसरा सामना राजस्थान रॉयल्सविरोधात २ एप्रिल रोजी खेळेल. मुंबई इंडियन्स संघाने सूर्यकुमार यादवला ८ कोटी रुपये देऊन रिटेन केलेले आहे.