स्पर्धेची चांगली सुरुवात झाली नसतानाही दुसऱ्या सत्रामध्ये एकामागोमाग एक विजय मिळवल्यामुळे मुंबई इंडियन्सचे आव्हान कायम आहे. आता मुंबईला ‘प्ले-ऑफ’ची स्वप्ने पडायला लागली असून, त्यांच्यासाठी वानखेडेवर गुरुवारी होणारा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा सामना करो या मरो असाच असणार आहे. हा सामना जिंकल्यास मुंबईला ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने दमदार पाऊल टाकता येईल, पण हा सामना गमवाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
मुंबईने एकामागून एक विजय मिळवत ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने चांगली कूच केली होती, पण गेल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांच्यासाठी ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने कूच करणे कठीण होऊन बसले असले, तरी ते अशक्य मात्र नक्कीच नाही. मुंबईला कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्याची मुंबईकडे चांगला संधी आहे.
मुंबईचा सलामीवीर लेंडल सिमन्स आणि किरॉन पोलार्ड चांगल्या फॉर्मात आहेत. पण अन्य फलंदाजांना मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.
गेल्या सामन्यात बंगळुरूच्या ए बी डी व्हिलियर्सने मुंबईच्या गोलंदाजांची लक्तरं वेशीवर टांगली होती. त्यामुळे गोलंदाजांना या सामन्यात पेटून उठावे लागणार आहे. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा वगळता एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आलेला नाही.
कोलकाताच्या संघाचा विचार केला तर कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा चांगल्या फॉर्मात आहेत. तडाखेबंद फलंदाज युसूफ पठाणला आताकुठे सूर गवसायला लागला आहे. गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे सुनील नरिन, बॅड्र हॉगसारखे फलंदाजांना नाचवणारे फिरकीपटू असून त्यांच्यावर गोलंदाजीची मुख्यत्वे करून मदार असेल.

Story img Loader