Mumbai Indians Makes New Record In IPL : मोहालिच्या बिंद्रा स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगतदार सामना झाला. पंजाबने मुंबईला विजयासाठी २१५ धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. परंतु, मुंबईचा सलामीवीर फलंदाज ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने १८.५ षटकात २१५ धावांचं लक्ष्य गाठलं आणि या सामन्यात मोठा विजय मिळवला. सलग दुसरा सामना जिंकून मुंबईने ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. परंतु, पंजाबचा पराभव करून मुंबईने या मैदानात इतिहास रचला. कारण १६ वर्षानंतर मुंबईने अशी चमकदार कामगिरी करून आयपीएलमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये एक नवीन विक्रम केला आहे. मुंबईने २०० हून अधिक धावांचं लक्ष्य गाठून सलग दोन सामने जिंकण्याचा खास पराक्रम केला आहे. १६ वर्षात मुंबई इंडियन्स अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला आहे. राजस्थान रॉयल्सविरोधात ३० एप्रिलला वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यात २१३ धावांचं लक्ष्य गाठून मुंबईने विजय संपादन केलं होतं. त्यानंतर काल बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईने पंजाबविरोधात २१५ धावांचा पाठलाग करत सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली आणि आयपीएलमध्ये इतिहास रचला.
मुंबईने आयपीएल करिअरमध्ये २०० हून अधिक धावांचं लक्ष्य गाठण्याची कामगिरी तीनवेळा केली आहे. यामध्ये मागील दोन सामन्यांच्या विजयाचा समावेश आहे. सलग दोन सामन्यात २०० हून अधिक धावांचा पाठलाग करून विजय संपादन करण्यात मुंबईला यश आलं. १६ वर्षात अशी चमकदार कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. इशान किशनने पंजाब किंग्जविरोधात ७५ धावा कुटल्या. तर सूर्यकुमार यादवने ६५ धावांची वादळी अर्धशतकी खेळी साकारली.