अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. पण पराभवातही हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून सक्षम आणि भक्कम असल्याचं सिद्ध केलं. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावांचा डोंगर उभारला. हार्दिकने गोलंदाजी करताना ४५ धावात २ विकेट्स पटकावल्या. विराट कोहली आणि लायम लिव्हिंगस्टोन या प्रमुख फलंदाजांना बाद करत हार्दिकने मुंबईच्या डावाला खिंडार पाडलं. या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ चाचपडत होता. धावगतीचं आव्हान प्रति षटकामागे १५पल्याड गेलं होतं. अशा परिस्थितीत मैदानात उतरलेल्या हार्दिकने झंझावाती फटकेबाजी केली. हार्दिकने १५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हार्दिकने तिलक वर्मासह पाचव्या विकेटसाठी ३४ चेंडूत ८२ धावांची अविश्वसनीय भागीदारी साकारली. हार्दिक मुंबईला जिंकून देणार असं चित्र होतं पण तो बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध करत हार्दिकने संघव्यवस्थापनाने कर्णधार म्हणून ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला.

मुंबई इंडियन्स संघाचा यंदाच्या हंगामातला हा पाचवा सामना होता. यापैकी चारमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पण या लढतीसह मुंबईने नेहमीचा झुंजार खेळ दाखवला आहे. लखनौविरुद्ध पराभवानंतर हार्दिकच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. सोमवारी झालेल्या लढतीतही हार्दिकने संघाला जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण १२ धावा कमी पडल्या. दुसरीकडे टीम इंडियाला टी२० वर्ल्डकप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद पटकावून देणारा रोहित शर्मा धावांसाठी झगडताना दिसतो आहे. पाच लढतीत रोहितने ०, ८, १३, १७ अशा धावा केल्या आहेत. एका लढतीत दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. गोलंदाजी करत नसल्याने मुंबई इंडियन्स संघ आता इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला खेळवताना दिसत आहे. मात्र अनुभवी रोहितचा इम्पॅक्ट तूर्तास तरी दिसलेला नाही.

२०२४ हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला संघात समाविष्ट केलं. गुजरात टायटन्सने हार्दिकच्या नेतृत्वात पहिल्यावहिल्या हंगामात जेतेपदाची कमाई केली होती. दुसऱ्या हंगामातही सातत्यपूर्ण प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. हार्दिक मुंबईच्या ताफ्यात येणार का याविषयी उलटसुलट चर्चा होत्या. यथावकाश तो मुंबई इंडियन्सचा भाग होणार असल्याचं स्पष्ट झालं. काही दिवसातच मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने हार्दिक संघाचा कर्णधार असेल अशी घोषणा केली आणि खळबळ उडाली.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ५ जेतेपदांवर नाव कोरलं होतं. २०१३ मध्ये कर्णधारपद हाती घेतल्यापासून रोहितनेच मुंबई संघाची नव्याने संघबांधणी केली. रोहितच्या नेतृत्वातच हार्दिक, कृणाल, बुमराह असे असंख्य खेळाडू तयार झाले. मुंबईकर रोहित हा चाहत्यांचा अतिशय लाडका आहे. हार्दिकला कर्णधारपदी नेमल्याने चाहते नाराज झाले. प्रत्यक्ष मैदानात, सोशल मीडियावर, प्रत्यक्ष सगळीकडे हार्दिक पंड्याची हुर्यो उडवण्यात आली. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही टीका करण्यात आली. रोहितऐवजी हार्दिक या निर्णयाला गुजरातची मुंबईवर सरशी असंही काहींनी संबोधलं. संपूर्ण हंगामात हार्दिकला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्स संघाची कामगिरीही यथातथाच राहिली. संघाला गुणतालिकेत तळाच्या स्थानी समाधान मानावं लागलं.

मात्र अवघ्या काही महिन्यात भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम लढतीत हार्दिकनेच शेवटचं षटक टाकलं. भारताच्या विजयात हार्दिकने मोलाची भूमिका बजावली. विजयी भारतीय संघाची मुंबईत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मरिन ड्राईव्हवर संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर संघाचा सत्कार करण्यात आला. ज्या मैदानात काही महिन्यांपूर्वी जोरदार ट्रोलिंगला सामोरं गेलेल्या हार्दिकसाठी जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या. अवघ्या काही महिन्यात कायापालट झाला होता.