इंडियन प्रिमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये सलग सहा सामने गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सला आणि पॉइण्ट्स टेबलमध्ये मुंबईच्या एक स्थान वर पण तळाच्या दोन संघांमध्ये असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला आपलं आव्हान टीकवण्यासाठी आजचा सामना महत्वाचा ठरणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असाच असणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहेत.

हे संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये नेमके आहेत कुठे?
सध्याची पॉइण्टस टेबलची स्थिती पाहिल्यास पहिल्या चारपैकी दोन संघ हे पहिल्यांदाच आयपीएल खेळणारे संघ आहेत. गुजरात टायटन्सचा संघ सहा पैकी पाच सामने जिंकून अव्वल स्थानी आहे. त्या खालोखाल सात पैकी पाच सामने जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. तिसऱ्या स्थानी सहापैकी चार विजय मिळवून राजस्थानचा संघ आहे. तर चौथ्या स्थानी के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपर जायण्ट्सचा संघ आहे. दहापैकी केवळ चारच संघांना प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळणार आहे.

दादा संघ तळाशी…
पाचव्या स्थानी सहापैकी चार विजय मिळवून सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे. सहाव्या स्थानी ऋषभ पंत नेतृत्व करत अशणारा दिल्लीचा संघ असून सातव्या स्थानी कोलकात्याच्या संघ आहे. आठव्या स्थानी पंजाब किंग्स इलेव्हनचा संघ असून त्यांना सातपैकी तीन सामने जिंकता आलेत. पॉइण्ट टेबलच्या तळाला चेन्नई आणि मुंबईचा संघ अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईला आतापर्यंत केवळ एक सामना जिंकता आलाय तर मुंबईने विजयी सामन्यांच्या रकान्यामधील भोपळाही अद्याप फोडलेला नाहीय. सर्व खेळलेल्या सहाच्या सहा सामन्यांमध्ये रोहितचा संघ पराभूत झालाय.

मुंबईला रोहितचं टेन्शन…
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने यंदा निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला सहा सामन्यांमध्ये केवळ ११४ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर फलंदाज, तसेच कर्णधार म्हणूनही या सामन्यामध्ये दडपण असणार आहे. त्याचा सलामीचा साथीदार इशान किशनच्या (सहा सामन्यांत १९१ धावा) कामगिरीतही सुधारणेला वाव आहे.

पोलार्डचीही चिंता, गोलंदाजीही सुमार…
मधल्या फळीत अनुभवी सूर्यकुमार यादवला डेवाल्ड ब्रेव्हिस आणि तिलक वर्मा या युवकांची चांगली साथ लाभते आहे. परंतु अनुभवी किरॉन पोलार्ड (सहा सामन्यांत ८२ धावा) विजयवीराची भूमिका बजावण्यात यंदाच्या पर्वात सातत्याने अपयशी ठरत आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा वगळता सर्वानीच निराशा केली आहे. या सामन्यात टायमल मिल्सच्या जागी रायली मेरेडिचला संधी मिळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

चेन्नईला दिलासा ऋतुराजचा…
तर दुसरीकडे, चेन्नईला गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पराभूत केले. मात्र, या सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (४८ चेंडूंत ७३ धावा) यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. तो आता कामगिरीत सातत्य राखेल अशी चेन्नईला आशा आहे.

जडेजा आणि मोईन अलीकडून अधिक अपेक्षा
तसेच शिवम दुबे (सहा सामन्यांत २२६ धावा) आणि रॉबिन उथप्पा (सहा सामन्यांत १९७ धावा) यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी अष्टपैलू योगदान देणे गरजेचे आहे.

Story img Loader