* मुंबई इंडियन्सचा ४ धावांनी विजय
* रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक
वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाला साजेशी धडाकेबाज खेळी साकारली आणि साऱ्यांच्याच डोळ्यांचे पारडे फेडले. फक्त ३९ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी करीत रोहितने नाबाद ७९ धावांची लाजवाब खेळी साकारली. त्यानंतर हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा यांनी कळस चढवला. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने किंग्ज ईलेव्हन पंजाबचा ४ धावांनी पराभव केला. पण अखेरच्या षटकांत प्रवीण कुमारने १५ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांनिशी २४ धावांची खेळी केल्यामुळे मुंबईला या विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत झगडायला लागले. रोहितच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
ऑफ-स्पिनर हरभजन सिंग आणि डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा यांच्या फिरकीपुढे पंजाबचा निभाव लागला नाही. ४-०-१४-३ असे हरभजनच्या गोलंदाजीचे लक्षवेधक पृथक्करण होते. पंजाबकडून डेव्हिड मिलरने ३४ चेंडूंत एक चौकार आणि ५ षटकारांसह ५६ धावांची खेळी साकारून एकाकी झुंज दिली, तर कप्तान डेव्हिड हसीने ३४ धावा केल्या.
तत्पूर्वी, प्रारंभी धिम्या गतीने रडत-खडत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने अनपेक्षितरीत्या २० षटकांत ३ बाद १७४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मुंबईचा तिसरा फलंदाज बाद झाला तेव्हा धावफलकावर १२.२ षटकांत ८६ धावा झळकत होत्या. त्यावेळी मुंबई जेमतेम सव्वाशे धावसंख्येपर्यंत मजल मारेल, अशी चिन्हे दिसत होती. पण अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये रोहित शर्माने किरॉन पोलार्डच्या साथीने सारे चित्रच पालटून टाकले.
वानखेडे स्टेडियमवर पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात रोहितने ज्या दिमाखात फलंदाजी केली, त्याचीच पुनरावृत्ती सोमवारी पुन्हा एकदा क्रिकेटरसिकांना अनुभवता आली. सचिन तेंडुलकर (९) निराशा केल्यानंतर दिनेश कार्तिक (२५) आणि ड्वेन स्मिथ (३३) यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला, पण धावांची गती कमालीची मंद होती. परंतु प्रभारी संघनायक रोहितला अजिबात मंजूर नव्हते. त्याला दुसऱ्या टोकाकडून पोलार्डने छान साथ दिली आणि चौथ्या विकेटसाठी ८८ धावांची नाबाद भागीदारी रचली. पोलार्ड १३ धावांवर असताना मनप्रीत गोनीने त्याचा त्रिफळा उडवला. पण तिसऱ्या पंचांनी हा चेंडू नोबॉल ठरविल्यामुळे पोलार्डला जीवदान मिळाले.
पंजाबचा कप्तान डेव्हिड हसीच्या अखेरच्या षटकात रोहित धावांचा अक्षरश: पाऊस पाडत २७ धावांची बरसात केली. रोहितने पहिल्या चेंडूवर लाँग ऑनला, तिसऱ्या चेंडूवर मिड विकेटला आणि चौथ्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार खेचले. अखेरच्या पाच षटकांत मुंबई इंडियन्सने ७२ धावा काढल्या, त्यामुळेच त्यांना ही समाधानकारक मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ३ बाद १७४ (ड्वेन स्मिथ ३३, दिनेश कार्तिक २५, रोहित शर्मा ७९, किरॉन पोलार्ड २०; प्रवीण कुमार १/२४) विजयी वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब : २० षटकांत सर्व बाद १७० (डेव्हिड हसी ३४, डेव्हिड मिलर ५६, प्रवीण कुमार २४; हरभजन सिंग ३/१४, प्रग्यान ओझा २/२२, मिचेल जॉन्सन २/२९)
किंग्ज इलेव्हन रोहित
वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाला साजेशी धडाकेबाज खेळी साकारली आणि साऱ्यांच्याच डोळ्यांचे पारडे फेडले. फक्त ३९ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी करीत रोहितने नाबाद ७९ धावांची लाजवाब खेळी साकारली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-04-2013 at 03:00 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians win by four runs against kings xi punjab