* रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ५८ धावांनी एकतर्फी विजय
* धवल कुलकर्णीचा भेदक मारा, ड्वेन स्मिथची अष्टपैलू चमक
सचिन तेंडुलकर बाद झाला तरी गोलंदाजांवर तुटून पडत अर्धशतक झळकावत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तोंडचे पाणी पळवले, तर गोलंदाजीमध्येही दोन फलंदाजांना बाद करत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ड्वेन स्मिथने मुंबईकरांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलवले. धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबईने बंगळळुरूपुढे १९५ धावांचे आव्हान ठेवले होते. भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने बंगळुरूचा १३६ धावांत सफाया करत एकतर्फी सामना जिंकला. धवल कुलकर्णीच्या अप्रतिम गोलंदाजीने बंगळुरूच्या फलंदाजांना चांगलेच रडवले.
मुंबईने १९४ धावांचा डोंगर उभारला असला तरी ख्रिस गेलचा (१८) फॉर्म पाहता बंगळुरूसाठी हे आव्हान कठीण वाटत नव्हते. पण हरभजनच्या गोलंदाजीवर रायुडूने सीमारेषेवर गेलचा अप्रतिम झेल पकडला आणि मुंबईकरांनी सुस्कारा सोडला. मुंबईकर धवल कुलकर्णीने अप्रतिम भेदक मारा करत बंगळुरूचे कंबरडे मोडले. धवलने तिलकरत्ने दिलशान (१३), विराट कोहली (१) आणि एबी. डि’व्हिलियर्स (२) यांना बाद केले आणि मुंबईचा विजय पक्का केला. बिनीचे चारही फलंदाज ४३ धावांवर बाद झाल्यावर बंगळुरूच्या हातून सामना निसटला.
तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजांनी तो योग्य असल्याचे दाखवून दिले. सचिन तेंडुलकरने (२३) पहिल्याच षटकात रवी रामपॉलला चौकार मारत चांगली सुरुवात केली. रामपॉलच्या दुसऱ्या षटकात तब्बल ४ चौकारांची लयलूट केल्यामुळे सचिनचा झंझावात घरच्या मैदानावर पाहायला मिळेल, असे वाटले होते, पण आर. पी. सिंगने त्याला पायचीत पकडत मुंबईला पहिला धक्का दिला. सचिन बाद झाल्यावर ड्वेन स्मिथने बंगळुरूच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. विनय कुमारच्या नवव्या षटकात त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले, पण अर्धशतकाची वेस ओलांडल्यावर त्याला एकही धाव करता आली नाही. त्याने ३६ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. स्मिथ बाद झाल्यावर खेळायला आलेला कर्णधार रोहित शर्माने (१०) धावचीत होत आत्मघात केला, तर त्याला बाद करणारा दिनेश कार्तिकही (४३) धावबाद होऊनच तंबूत परतला. किरॉन पोलार्ड खेळत असताना मुंबईचा संघ दोनशे धावांचा टप्पा गाठेल, असे वाटत होते. पण डावातले १८वे षटक मुंबईसाठी वाइट ठरले. विनय कुमारच्या या षटकात मुंबईने कार्तिक, पोलार्ड आणि अंबाती रायुडू (०) यांचे विकेट्स गमावले. या तीनपैकी कार्तिक आणि रायुडू धावचीत झाले आणि त्या दोघांनाही कोहलीने बाद केले. पोलार्डने १६ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकार लगावत ३४ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. हरभजन सिंगने (१६) अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी केल्यामुळे मुंबईला १९४ धावांचा पल्ला गाठता आला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ७ बाद १९४ (ड्वेन स्मिथ ५०, दिनेश कार्तिक ४३, किरॉन पोलार्ड ३४; रवी रामपॉल १/ ३५) विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ७ बाद १३६ (सौरभ तिवारी २१; धवल कुलकर्णी ३/१९, ड्वेन स्मिथ २/२०).
सामनावीर : ड्वेन स्मिथ
संघ सा वि हा गु
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ९ ६ ३ १२
चेन्नई सुपर किंग्स ८ ६ २ १२
राजस्थान रॉयल्स ८ ५ ३ १०
मुंबई इंडियन्स ८ ५ ३ १०
सनरायजर्स हैदराबाद ९ ५ ४ १०
किंग्स इलेव्हन पंजाब ८ ४ ४ ८
कोलकाता नाइट रायडर्स ८ ३ ५ ६
पुणे वॉरियर्स ८ २ ६ ४
दिल्ली डेअरडेव्हिल्स ८ १ ७ २
टिट-बिट्स
रोहितको गुस्सा क्यो आता है
कर्णधाराची धुरा सांभाळल्यापासून गंभीरपणे खेळणाऱ्या रोहित शर्माने शनिवारी वानखेडेवर चांगली सुरुवात केली खरी, पण एक धाव पूर्ण केल्यानंतर दिनेश कार्तिकला दुसऱ्या धावेसाठी आवाज न देताच तो धावत सुटला. बंगळुरूच्या क्षेत्ररक्षकांनी त्याला धावचीत केले आणि रागानेच रोहितने बॅट मैदानात आपटली. तसेच कार्तिककडे न पाहताच ‘डग आऊट’मध्ये पोहोचल्यावर त्याने हेल्मेट, ग्लोव्हज आपटत आपला राग व्यक्त केला.
मुंबईचे ‘स्मिथ’हास्य!
* रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ५८ धावांनी एकतर्फी विजय * धवल कुलकर्णीचा भेदक मारा, ड्वेन स्मिथची अष्टपैलू चमक सचिन तेंडुलकर बाद झाला तरी गोलंदाजांवर तुटून पडत अर्धशतक झळकावत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तोंडचे पाणी पळवले, तर गोलंदाजीमध्येही दोन फलंदाजांना बाद करत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ड्वेन स्मिथने मुंबईकरांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलवले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-04-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians won by 58 runs against royal challengers bangalore