मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे आयपीएलमधील दोन अव्वल संघ, दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेले आणि कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देणारे. मात्र महत्त्वाच्या सामन्यांत अपयशी ठरलेले. त्यामुळेच बंगळुरूला दोन वेळा तर मुंबईला एकदा आयपीएल जेतेपदाने हुलकावणी दिली. आता हेच दोन बलाढय़ संघ आयपीएलच्या सहाव्या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुरुवारी एकमेकांशी भिडणार आहेत.
चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० विजेत्या मुंबई इंडियन्सने स्टार खेळाडूंना विकत घेण्यासाठी अमाप पैसा खर्च केला आहे. मात्र तरीही मुंबईला पाच मोसमात एक वेळा अंतिम फेरी आणि दोन वेळा उपांत्य फेरीत मजल मारण्यात यश आले होते. या मोसमात रिकी पाँटिंग मुंबई संघाची कमान सांभाळणार आहे. त्यामुळे मुंबई संघ पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद उंचावेल, अशी आशा आहे. अंबाती रायुडू आणि रोहित शर्मा यांनी गेल्या मोसमात अनुक्रमे ३३३ आणि ४३३ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून भरीव योगदानाची अपेक्षा मुंबईला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा ड्वेन स्मिथ अथवा जेम्स फ्रँकलिनच्या साथीने डावाची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर पाँटिंग आणि दिनेश कार्तिक यांच्या समावेशाने मुंबईची फलंदाजी मजबूत आहे.
लसिथ मलिंगा, प्रग्यान ओझा आणि मुनाफ पटेल हे आयपीएलमधील सर्वाधिक बळी मिळवणारे गोलंदाजही मुंबईच्या दिमतीला आहेत. मात्र संघात ग्लेन मॅक्सवेल, ड्वेन स्मिथ, किरॉन पोलार्ड, जेकब ओरम, जेम्स फ्रँकलिन आणि मलिंगासारखे बरेचसे परदेशी खेळाडू असल्यामुळे कोणत्या चार परदेशी खेळाडूंना संघात स्थान द्यायचे, हा पेच मुंबईला प्रत्येक सामन्याआधी सोडवावा लागेल.
बंगळुरू संघाचे नेतृत्व युवा खेळाडू विराट कोहली सांभाळत आहे. त्यामुळे बंगळुरू संघ आयपीएलच्या सहाव्या मोसमात कितपत मजल मारणार, याची उत्सुकता सर्वाना आहे. ख्रिस गेल, तिलकरत्ने दिलशान, एबी डी’व्हिलियर्ससारखे सामना एकहाती जिंकून देणारे खेळाडू बंगळुरूकडे आहेत. गेल्या वर्षी झालेल्या दुखापतीतून वेगवान गोलंदाज झहीर खान अद्याप पूर्णपणे सावरू शकला नाही. ही चिंता बंगळुरूला सतावत आहे.
संघ – मुंबई इंडियन्स : रिकी पाँटिंग (कर्णधार), अबू नेचीम अहमद, अक्षर पटेल, आदित्य तरे, आयडेन ब्लिझार्ड, अंबाती रायुडू, अमितोझे सिंग, धवल कुलकर्णी, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, हरभजन सिंग, जेकब ओरम, जलाज सक्सेना, जेम्स फ्रँकलिन, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, मुनाफ पटेल, नॅथन कोल्टर-निल, फिल ह्यूज, पवन सुयल, प्रग्यान ओझा, रिषी धवन, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव, सुशांत मराठे, युजवेंद्र सिंग चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, अभिमन्यू मिथुन, अभिनव मुकुंद, अँड्रय़ू मॅकडोनाल्ड, अरुण कार्तिक, चेतेश्वर पुजारा, ख्रिस गेल, ख्रिस्तोफर बार्नवेल, डॅनियल ख्रिस्तियान, डॅनियल व्हेटोरी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, के. पी. अप्पान्ना, करुण नायर, मयांक अगरवाल, मोझेस हेन्रिक्स, मुरली कार्तिक, मुथय्या मुरलीधरन, पंकज सिंग, प्रसान्त परमेश्वरन, आर. विनय कुमार, रवी रामपॉल, रुद्रप्रताप सिंग, एस. अरविंद, संदीप वॉरियर, सौरभ तिवारी, शेल्डन जॅक्सन, सनी सोहेल, सय्यद मोहम्मद, तिलकरत्ने दिलशान, विजय झोल, झहीर खान.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून.
      मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ या मोसमासाठी कितपत सज्ज आहे, याचा अंदाज येईल. त्यानंतरच पुढील सामन्यासाठी कशी रणनीती आखायची, हे ठरवावे लागणार आहे. मुंबईचा संघ बलाढय़ असल्यामुळे सलामीचा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
– डॅनियल व्हेटोरी, बंगळुरूचा फिरकीपटू
सलामीच्या लढतीला मलिंगा मुकणार!
बंगळुरू : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या सलामीच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. मलिंगा मुंबई संघात मंगळवारी दाखल होणार होता, पण तो आता गुरुवारीच संघात सामील होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात मलिंगाच्या पाठीला दुखापत झाली होती. मलिंगाच्या अनुपस्थितीत मुनाफ पटेल, नॅथन कोल्टियर-नील आणि मिचेल जॉन्सन यांच्यावर मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त असेल.
डेल स्टेन, हैदराबाद सनरायझर्सचा गोलंदाज
भारतात जाण्यासाठी विमान पकडत आहे, आयपीएलमध्ये खेळण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. या भारतभेटीतही आणखी काही मित्र बनवण्याचा प्रयत्न असेल. यंदाचे वर्ष माझ्यासाठी चांगले असेल अशी आशा आहे.

Story img Loader