Naveen Ul Haq Instagram:  आयपीएलमध्ये काल रात्री लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्याच्या शेवटच्या क्षणी विराट कोहलीची लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू आणि अफगाण क्रिकेटर नवीन-उल-हकशी बाचाबाची झाली. यानंतर कोहली एलएसजीच्या अमित मिश्रा आणि नंतर गौतम गंभीर यांच्याशी वाद घालताना दिसला. या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यात आता इन्स्टाग्रामवरही या वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. विराट कोहलीने आपली बाजू मांडली आहे, तर नवीन-उल-हकनेही उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीरशी शाब्दिक चकमक होण्यापूर्वी विराट कोहली लखनऊचा मध्यमगती गोलंदाज नवीन-उल-हकशी भिडला. या संपूर्ण वादात तो तिसरा महत्त्वाचा पात्र आहे, ज्यावरून भांडण सुरू झाले. आता अफगाणिस्तानच्या या खेळाडूने १ मेच्या रात्री सामन्यात घडलेल्या घटनेवर सोशल मीडियामध्ये आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन-उल-हकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीत इंग्रजीत लिहिले, ‘You GET WHAT YOU DESERVE THATS HOW BE AND THATS HOW IT GOES.’ ज्याचे मराठीत भाषांतर आहे, “तुम्ही ज्यासाठी पात्र असता ते मिळतेच आणि हो, हे असेच झाले पाहिजे. गोष्टी अशाच चालत राहिल्या पाहिजेत,” अशा शब्दांत नवीनने कालच्या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

कोणाकडे बोट दाखवत केला इशारा?

या सामन्यात तीन विकेट्स घेणाऱ्या नवीन-उल-हकची विराट कोहलीशी शाब्दिक चकमक झाली. मैदानावर झालेल्या या घटनेनंतर आता त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, “तुम्ही जसे आहात, ज्या गोष्‍टीसाठी तुम्‍ही पात्र आहात तेच तुम्‍हाला मिळते आणि हीच गोष्‍ट खरी आहे अन् आयुष्‍यात हे असेच घडत असते.” अशी पोस्ट त्याने विराट कोहलीला उत्तर देण्यासाठी तर केली नाही ना? चाहते आता त्याच्या शब्दांचा आपल्या पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नवीनने कोणाचेही नाव लिहिलेले नाही. त्याचा रोख कोणाच्या दिशेने होता? हे ज्यांना समजले आहे त्यांनी त्या पद्धतीने कमेंट्स केल्या आहेत.

विराटने नेमकी काय पोस्ट केली होती?

सामन्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, जिच्याकडे त्याचे स्पष्टीकरण म्हणून पाहिले जात आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आपण जे ऐकतो ते तथ्य नसून मत आहे. आपण जे पाहतो ते तथ्य नसून एक वृत्ती आहे. सत्य कोणालाच ऐकून घ्यायचे नाही आहे.” विराटने मार्कस ऑरेलियसचे हे वाक्य कोट करत कालच्या घटनेवर भाष्य केले आहे. याशिवाय विराट कोहलीने आपला डीपीही बदलला आहे. नवीन डीपीमध्ये तो पत्नी अनुष्कासोबत दिसत आहे.

हेही वाचा: IPL 2023: ‘जो आपल्याला नडला, त्याला…’, सामना संपताच विराट कोहली अन् गौतम गंभीर भिडले, तुफान बाचाबाचीचा Video व्हायरल

सामन्यात काय झाले?

बंगळुरूच्या विजयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना कोहलीने नवीनला काहीतरी सांगितले. कोहली बोलणार इतक्यात नवीनही आश्‍चर्याने येतो आणि काहीतरी बोलतो. येथे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर कोहली पुढे चालत असताना तो लखनऊच्या काइल मेयर्सशी बोलू लागला. मग त्यानंतर गंभीर येतो, मेयर्सला विराटपासून दूर घेऊन जातो आणि त्याच्याशी बोलण्यास नकार देतो. हे कोहलीला पटत नाही, यानंतर गंभीर काहीतरी बोलतो, ज्यावर कोहली त्याला जवळ बोलावतो आणि दोघे खूप जवळ येतात. दोघांमध्ये वादावादी होते. शेवटी लोकेश राहुल या दोघांमध्ये मध्यस्थी करत कोहलीला दूर घेऊन जातो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naveen ul haq this is what you deserve straight mess what did naveen ul haq write about virat kohli avw